सलामीवीर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आपला पहिला डाव ६१०/६ या धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात भारतीय संघाकडे ४०५ धावांची आघाडी होती. रोहित शर्माने शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने डाव घोषित करुन उरलेल्या वेळात श्रीलंकेच्या संघाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र इशांत शर्माने पहिल्याच षटकात समरविक्रमाचा त्रिफळा उडवत लंकेला पहिला धक्का दिला. यानंतर लहिरु थिरीमने आणि दिमुथ करुणरत्ने जोडीने लंकेचा डाव सावरला.

त्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज द्विशतक झळकावत श्रीलंकेला बॅकफूटलला ढकललं. श्रीलंकेकडून दिमुथ करुणरत्नेने ३ बळी घेतले. त्याला गमगे, हेरथ आणि शनकाने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र तोपर्यंत भारतीय फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती.

  • तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची धावसंख्या २१/१
  • थिरीमने-करुणरत्ने जोडीने लंकेची पडझड थांबवली
  • इशांत शर्माच्या गोलंदाजीवर समरविक्रमा माघारी
  • श्रीलंकेच्या डावाची अडखळती सुरुवात
  • ६१०/६ धावसंख्येवर भारताचा पहिला डाव घोषित, भारताकडे ४०५ धावांची आघाडी
  • रोहित शर्माने वृद्धीमान साहाच्या मदतीने केलं शतकं साजरं
  • ठराविक अंतराने आश्विनला माघारी धाडण्यात पेरेराला यश, भारताचा सहावा गडी माघारी
  • अखेर विराट कोहलीला बाद करण्यात श्रीलंकेला यश, पेरेराच्या गोलंदाजीवर कोहली माघारी
  • कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक, भारताकडे भक्कम आघाडी
  • चहापानानंतर विराट-रोहित शर्माची फटकेबाजी सुरुच
  • चहापानापर्यंत भारताची धावसंख्या ५०७/४, आघाडी ३०२ धावांची
  • रोहित शर्माचं अर्धशतक, भारताची आघाडी ३०० धावांच्या पार
  • रोहित-कोहलीच्या फटकेबाजीमुळे भारताच्या धावांचा ओघ वाढला
  • रहाणेनंतर मैदानात आलेल्या रोहित शर्माकडून खेळाची आक्रमक सुरुवात
  • दिलरुवान पेरेराच्या गोलंदाजीवर रहाणे बाद, रहाणेच्या नावावर अवघ्या २ धावा
  • लंच टाईमनंतर भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे माघारी
  • भारताकडे पहिल्या सत्रापर्यंत १९९ धावांची आघाडी
  • तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारताची धावसंख्या ४०४/३
  • १४ चौकारांसह पुजाराची १४३ धावांची खेळी
  • तिसऱ्या विकेटसाठी पुजाराची कोहलीबरोबर १८३ धावांची भागीदारी
  • दसुन शनकाच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा माघारी, भारताला तिसरा धक्का
  • अखेर चेतेश्वर पुजारा-विराट कोहलीची जोडी फोडण्यात श्रीलंकेला यश
  • कर्णधार विराट कोहलीनेही पूर्ण केलं आपलं शतक, भारताची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल
  • विराट कोहलीकडून सुरेख फटकेबाजी, पुजाराचीही संयमी खेळी
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळातही श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश नाही
  • दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पुजारा-कोहली जोडीकडून डावाची सावध सुरुवात