लहिरू थिरिमाने आणि दिनेश चंडीमल यांच्या नाबाद शतकांच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४ बाद ५७० धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या २ बाद १३५ झाल्या आहेत. ३ बाद ३६१ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले ते थिरिमाने-चंडीमल भागीदारी. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद २०३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनीही पहिलेवहिले कसोटी शतक साजरे केले. थिरिमानेने १४ चौकारांसह १५५ तर चंडीमलने १२ चौकार आणि २ षटकारांसह ११६ धावा केल्या. बांगलादेशतर्फे सोहाग गाझीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. शमिदा इरंगाने जहरुल इस्लामला बाद केले. अनामल हक अजंथा मेंडिसची शिकार ठरला. यानंतर मोहम्मद अशरफुल आणि मोमिनुल हकने ७० धावांची भागीदारी करत डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अशरफुल ६५ तर मोमिनुल ३५ धावांवर खेळत होता.