श्रीलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने श्रीलंकन खेळाडूंबद्दल संताप व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवे. पाकिस्तान दौर्‍यावर न जाण्याचा निर्णय घेणार्‍या खेळाडूंकडून दंड वसूल करण्यात यावा, असा सल्ला जावेद मियांदादने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला दिला आहे. तसेच पाकिस्तानी खेळाडूंनी आगामी मालिकेवर लक्ष केंद्रीत करावे. या मालिकेसाठी जोरदार तयारी करावी. श्रीलंकेचा कोणता खेळाडू दौर्‍यावर आला नाही याचा विचार न करता खेळाडूंनी चांगला खेळ करण्यावर भर द्यावा, असा कानमंत्र मियांदादने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना दिले आहे.

२७ सप्टेंबरपासून श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहे. यातून श्रीलंकेचा वनडे कर्णधार खेळाडू दिमुथ करुणारत्ने, टी-२० सामन्याचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांनी माघार घेतली आहे.