एकाच डावात १० बळी टिपणारा गोलंदाज म्हटलं की क्रिकेटप्रेमींना पहिलं आठवतो तो भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनी ही कामगिरी केली होती. आता श्रीलंकेचा ३१ वर्षीय खेळाडू मलिंदा पुष्पाकुमाराने याने विक्रम करत एकाच डावात १० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. फक्त ही कामगिरी त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये केली आहे. पुष्पाकुमाराने कोलंबो क्रिकेट क्लबकडून खेळताना अवघ्या ३७ धावा देताना १० च्या १० बळी घेतले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर कोलंबोने हा सामना २३५ धावांनी जिंकला.

कोलंबो क्रिकेट क्लब आणि सराकेन्स स्पोर्टस क्लब यांच्यात सुरू असलेल्या स्थानिक कसोटी सामन्यात मिलिंदा पुष्पाकुमाराने सामन्यात ११० धावा देत एकूण १६ बळी घेतले. चौथ्या डावात ३४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सराकेन्स संघाला एकट्या मिलिंदा पुष्पाकुमाराने केले. स्थानिक क्रिकेटमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या आधी स्थानिक क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नईम अख्तरने १९९५ साली २८ धावा देताना १० बळी घेतले होते. रावळपिंडीकडून खेळताना त्याने पेशावर विरुद्ध ही कामगिरी केली होती. तर, पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू झुल्फिकार बाबर याने २००९ साली मुलतानकडून खेळताना इस्लामाबाद विरुद्ध १४६ धावा देताना १० बळी घेतले होते.