एकीकडे पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवशी पंचांनी श्रीलंकेचा कर्णधरा दिनेश चंडीमलच्या कृतीकडे कानाडोळा केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनूसार, कोणत्याही क्षेत्ररक्षकाने चेंडु आपल्या ताब्यातून निसटल्यावर, चेंडू फलंदाजाच्या दिशेने थ्रो करण्याची नक्कल केल्यास प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल करण्यात येतात.

अवश्य वाचा – निधास चषक २०१८ : भारत-श्रीलंका-बांगलादेश तिरंगी मालिकेचं वेळापत्रक जाहीर

कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५३ व्या षटकात श्रीलंकेच्या शनकाच्या गोलंदाजीवर भारताच्या भुवनेश्वर कुमारने फटका खेळून धाव काढली. हा चेंडू श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल अडवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आपल्या ताब्यातून चेंडू निसटल्यानंतरही चंडीमलने चेंडू आपल्या हातात असल्याचं भासवत फलंदाजाच्या दिशेने थ्रो करण्याची नक्कल केली. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, चंडीमलची ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी आहे. मात्र, मैदानातील पंच नायजेल लाँग आणि जोएल विल्सन यांनी या कृतीकडे कानाडोळा केला. जोएल विल्सन यांनी चंडीमलशी संवाद साधून त्याला समज दिली. मात्र, यावेळी भारतीय संघाला अपेक्षित असणाऱ्या ५ धावा त्यांनी बहाल केल्या नाहीत. या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहलीही ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच नाराज झालेला पहायला मिळाला.

कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजीपुढे भारताचा पहिला डाव १७२ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने आश्वासक खेळी केली नाही. मात्र, पंचांच्या या निर्णयाची चर्चा सामन्यादरम्यान समालोचकांमध्ये होताना पहायला मिळाली. याआधी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक वन-डे सामन्यांमध्ये, आयसीसीच्या नवीन नियमांचं पहिल्यांदा उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश चंडीमल हा नवीन नियमांचा भंग करणारा पहिला खेळाडू ठरू शकला असता. मात्र, पंचांनी कानाडोळा केल्याने चंडीमल या नियमाच्या कचाट्यातून अलगद सुटला.