कोलकाता कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर नागपूर कसोटीवर भारताने आपली पकड मजबूत बसवलेली आहे. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्या डावात ६०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा करुन ४०५ धावांची आघाडी घेतली. सलामीवीर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा यांची शतकं तर कर्णधार विराट कोहलीचं द्विशतर या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं केलं.

भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान चांगलीच तारांबळ उडाली. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय खेळाडूंनी तब्बल १० विक्रमांची नोंद केली. या विक्रमांवर आपण एक नजर टाकणार आहोत.

३ – कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पहिल्या ६ पैकी ४ फलंदाजांनी शतकं झळकावण्याची ही तिसरी वेळ ठरली.

३ – ५० पेक्षा जास्त धावा काढण्याची कसोटी क्रिकेटमधली ही सलग तिसरी वेळ ठरली.

५ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमधलं हे पाचवं द्विशतक ठरलं. यासह विराट कोहलीने ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली असून ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा ४ द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला आहे.

६ – कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधार या नात्याने १५० पेक्षा जास्त धावा काढण्याची ही सहावी वेळ ठरली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाहीये.

७ – कसोटी क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा जास्त धावसंख्या उभी करण्याची विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ही सातवी वेळ ठरली आहे. इतर कोणत्याही देशाच्या कर्णधारांनी आतापर्यंत ५ पेक्षा जास्त वेळा ६०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारलेली नाहीये.

१० – २०१७ या वर्षातलं विराट कोहलीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे दहावं शतक ठरलं. याचसोबत विराट कोहलीने रिकी पाँटींगच्या नावावर असलेला ९ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. २००९ साली रिकी पाँटींगने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार या नात्याने एका वर्षात ९ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली होती.

१२ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे १२ वं कसोटी शतक ठरलं आहे. या शतकासह विराटने सुनिल गावसकर यांच्या नावे असलेला ११ शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

३० – कसोटी क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्याची भारताची ही ३० वी वेळ ठरली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ३२ वेळा ६०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे.

५३ – चेतेश्वर पुजाराने ५३ डावांमध्ये भारतामध्ये ३००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर ५५ डावांमध्ये या विक्रमाची नोंद होती, मात्र कालच्या दिवसात चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.

२१३ – श्रीलंकेविरुद्ध कर्णधार या नात्याने विराट कोहलीची २१३ धावांची खेळी ही आतापर्यंत सर्वोत्तम ठरली आहे. याआधी कपिल देव यांनी १९८६ साली कानपूर कसोटीत कर्णधार या नात्याने १६३ धावांची खेळी केली होती.