भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. संपूर्ण दिवसात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत केवळ ११.५ षटकं टाकली. या दरम्यान भारताच्या आघाडीच्या फळीला माघारी पाठवण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आलं. सुरंगा लकमलने भारताच्या लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली यांना माघारी धाडत भारताला चांगलाच धक्का दिला. सुरंगा लकमलने पहिल्या दिवसात ६ षटकं टाकली. यातील सर्व षटकं ही निर्धाव होती, यावरुन पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची झालेली अवस्था लक्षात येते. मात्र केवळ ११.५ षटकांचा खेळ होऊनही कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी काही खास विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – पहिल्या दिवसाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुल सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. याचसोबत सलग कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करण्याचा लोकेश राहुलचा प्रयत्न संपुष्टात आलाय. लोकेश राहुलने आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. या विक्रमासोबत लोकेश राहुलला एव्हरटॉन विक्स, अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि ख्रिस रॉजर्स या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे.

२ – कसोटी क्रिकेटच्या आपल्या इतिहासात पहिल्या चेंडुवर विकेट घेण्याची श्रीलंकेची ही दुसरी वेळ ठरली आहे. २०१० साली पल्लकेले कसोटीत सुरंगा लकमलनेच वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं होतं. यानंतर लकमलनेच काल लोकेश राहुलला पहिल्या चेंडूवर बाद केलं.

५ – एका वर्षात कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ. यासोबत विराटने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. १९८३ साली कपिल देव एका वर्षात पाचवेळा शून्यावर बाद झाले होते.

६ – कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल भारताचा सहावा फलंदाज ठरला. याआधी सुनील गावसकर (३ वेळा), सुधीर नाईक, डब्ल्यू. व्ही. रमण, एस. एस. दास, वासिम जाफर हे फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाले होते.

१३.८३ – इडन गार्डन्स मैदानावर विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधली सरासरी ही केवळ १३.८३ इतकी आहे. एका मैदानातली विराट कोहलीची ही सर्वाच निच्चांकी सरासरी ठरली आहे.

२७ – २०१४ साली सुरंगा लकमलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग २७ चेंडू निर्धाव टाकले होते. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सुरंगा लकमलने आपला हा विक्रम मोडीत काढत तब्बल ६ षटकं निर्धाव फेकली.

१९८३ – कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन हे एक आकडी संख्येवर बाद झाले. याआधी १९८३ साली इडन गार्डन्सच्या मैदानावर भारताचे सलामीवीर शून्यावर माघारी परतले होते.

१९८७ – इडन गार्डन्स मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा पाकिस्तान हा शेवटचा संघ होता. १९८७ च्या कसोटी पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता, मात्र हा सामना अनिर्णित राहिला होता.

२००१ – दिनेश चंडीमलच्या आधी २००१ साली पाहुण्या संघाचा कर्णधार (ऑस्ट्रेलिया) स्टिव्ह वॉने मुंबई कसोटी नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

२००७ – लोकेश राहुलआधी २००७ साली भारताचा वासीम जाफर बांगलादेशविरुद्ध चितगाँव कसोटीत पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. पहिल्या चेंडूवर बाद होणारा भारताचा तो शेवटचा सलामीवीर ठरला होता, यानंतर लोकेश राहुलने काल कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला.