श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला तब्बल २३९ धावांसह डावाने पराभूत करत मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात २१३ धावांची दमदार खेळीबद्दल कर्णधार विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र, सामना जिंकल्यानंतरही विराटने नागपूरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली.
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाजांना साथ देणारी असावी, अशी मागणी केली होती. पण, ही खेळपट्टीमध्ये जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल दिसली नाही. परिणामी जलदगती गोलंदाजांना मदत मिळाली नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. तसेच फिरकीपटूंना देखील मदत करणारी होती.

यावेळी विराट कोहलीने नागपूरच्या खेळपट्टीची तुलना ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीशी केली. नागपूरपेक्षा कोलकाताच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली होती, असे कोहली म्हणाला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर इनस्विंग आणि आऊट स्विंगला मदत मिळाली. मात्र, नागपूरच्या मैदानात हे पाहायला मिळाले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले. याबद्दल तो म्हणाला की, धावफलक हलता ठेवण्यासाठी स्ट्राईक बदलत ठेवण्यावर भर दिला. यावेळी त्याने पुजारा, मुरली विजय आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. पुजारा सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. मुरलीने बऱ्याच कालावधीनंतर दमदार पुनरागमन केलं आहे. रोहितच्या शतकावर विराट म्हणाला की, तो एक चांगला खेळाडू आहे. पुढेही तो अशीच कामगिरी करेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.