करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२० साली ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक आयसीसीने एक वर्षासाठी पुढे ढकलला आहे. यानंतर २०२१ आणि २०२२ साली होणाऱ्या स्पर्धेचं यजमानपद हे अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आलं आहे. २०२० साली स्पर्धा रद्द झाल्यामुळे २०२२ सालचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला देण्यात आलं आहे. परंतू जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, २०२१ विश्वचषकासाठी आयसीसीने आधीच तयारी करुन ठेवण्याचं ठरवलंय. करोनामुळे भारतातली परिस्थिती न सुधारल्यास श्रीलंका किंवा युएई या दोन देशांचा टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी विचार केला जाऊ शकतो. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

करोनाचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. सध्या देशातली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं आहे. तसेच पुढील स्थानिक हंगामासाठी बीसीसीआय रणजी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० या दोनच स्पर्धा खेळवण्याच्या तयारीत आहे. २०२१ टी-२० विश्वचषकासाठी अद्याप वर्षभराचा कालावधी बाकी असली तरीही तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पर्याय म्हणून आयसीसीने श्रीलंका आणि युएई या दोन देशांचा आयोजनासाठी विचार करुन ठेवल्याचं कळतंय. बीसीसीआयने मात्र २०२१ चा विश्वचषक भारतातचं आयोजित होईल याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाला महेंद्रसिंह धोनीची गरज नाही !