न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी मालिका

कोलंबो : पी. सारा ओव्हल मैदानावर श्रीलंकेची कामगिरी आतापर्यंत फारशी प्रभावी झालेली नाही. याचा फायदा घेत गुरुवारपासून सुरू होणारी दुसरी आणि अखेरची कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा निर्धार न्यूझीलंडने केला आहे.

गॉल मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असते, तर एसएससी, दी ओव्हल मैदान फलंदाजांचे नंदनवन मानले जाते. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी सर डॉन ब्रॅडमन खेळलेल्या सारा ओव्हल मैदानावर वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी आहे. या मैदानावर श्रीलंकेचा संघ गेलया १० वर्षांत सात सामने खेळला आहे. यापैकी पाच सामने त्यांनी गमावले आहेत. सात वर्षांपूर्वी न्यूझीलंडनेही श्रीलंकेला येथे हरवले होते. त्या सामन्यात टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी अनुक्रमे आठ व सात बळी मिळवले होते.