आजचा सामना ; श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका

गेल्या काही वर्षांत श्रीलंकेचा संघ भरकटलेला पाहायला मिळाला आहे. अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचे नेतृत्व करण्यासाठी उत्साही वाटत नसल्याने त्याचा परिणाम श्रीलंकेच्या संघावर झालेला पाहायला मिळाला आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत मॅथ्यूजला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपुल थरंगाच्या नेतृत्वाखाली संघाला नवीन संजीवनी मिळते का, यावर क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेपेक्षा उजवा वाटत आहे. त्यामुळे दिशाहीन श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पेलवणार का, हा मोठा प्रश्न असेल.

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील चार फलंदाज क्रमवारीत अव्वल चार फलंदाजांच्या यादीत आहेत. कर्णधार एबी डी’व्हिलियर्सकडे एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. हशिम अमलाने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावत आपण फक्त नांगरधारी फलंदाज नाही, हे दाखवून दिले आहे. फॅफ डय़ू प्लेसिस, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, क्विंटन डी’कॉक हे दर्जेदार फलंदाज दक्षिण आफ्रिकेकडे आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत त्यांचा कागिसो रबाडा हा अव्वल स्थानावर आहे. त्याला या सामन्यात मॉर्ने मॉर्केलसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाची सुयोग्य साथ मिळेल. इम्रान ताहिर किंवा केशव महाराज हे दोघेही फिरकीपटू चांगल्या फॉर्मात असले तरी त्यांच्यापैकी एकालाच या सामन्यात संधी मिळू शकते.

श्रीलंकेचा संघ पाहिला तर मॅथ्यूज खेळणार नसेल, तर त्यांना सामन्यापूर्वीच त्यांना पहिला धक्का बसेल. उपुल थरंगाकडे चांगला अनुभव असला तरी तो नेतृत्व करत असताना अन्य खेळाडूंची त्याला कशी साथ मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. लसिथ मलिंगासारखे वेगवान अस्त्र श्रीलंकेच्या संघात आहे. त्याचा अनुभव या वेळी श्रीलंकेच्या नक्कीच कामी येईल. त्याची ही अखेरची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा असू शकते, त्यामुळे तो पूर्ण झोकून देऊन या सामन्यात उतरेल. नुवान कुलसेकरा हा मध्यमगती गोलंदाज असला तरी त्याच्याकडे योग्य दिशा आणि टप्पा असल्यामुळे त्याचा मारा भेदक ठरू शकतो. दिनेश चंडिमल हा अनुभवी फलंदाज श्रीलंकेकडे आहे.

दोन्ही संघांचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेपेक्षा श्रीलंकेच्या संघात जिंकण्याची ईर्षां आणि ऊर्जेचा अभाव दिसत आहे. या स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. श्रीलंकेला काही मानहानीकारक पराभव पत्करावे लागले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी सात धावांची गरज होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हा सामना जिंकवता आला नव्हता. त्यामुळे हा सामना जिंकून मनोबल उंचावण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. पण श्रीलंकेपेक्षा दक्षिण आफ्रिकेचे पारडे नक्कीच जड दिसत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • दक्षिण आफ्रिका : एबी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी’कॉक, जेपी डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहिर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मार्ने मॉर्केल, वेन पार्नेल, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, अँडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस.
  • श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज, उपलि थरंगा (कर्णधार), दिनेश चंडिमल, निरोशन डिकवाला, नुवान प्रदीप, असेला गुणरत्ने, नुवान कुलसेकरा, चमारा कपुगेदरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, कुशल मेंडीस, कुशल परेरा, थिसारा परेरा, केसुगे प्रसन्ना, लकशन संदाकन.