सामनानिश्चितीमुळे ‘आयसीसी’ची कारवाई

सामनानिश्चितीच्या आरोपामुळे श्रीलंकेचे गोलंदाजीचे प्रशिक्षक न्यूवान झोयसा यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबनाची कारवाई केली आहे.

‘‘झोयसा यांच्या त्वरित आणि तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून झोयसा यांना आपल्यावरील आरोपांबाबत उत्तर देण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे,’’ असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

श्रीलंकेच्या क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची आयसीसीकडून सखोल चौकशी सुरू आहे. विश्वविजेत्या संघातील फलंदाज सनथ जससूर्यावरही काही दिवसांपूर्वी चौकशीला सहकार्य न केल्याबद्दल आयसीसीने ठपका ठेवला होता.

माजी डावखुरे वेगवान गोलंदाज झोयसा यांनी ३० कसोटी आणि ९५ एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांच्याकडे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले.

झोयसा यांच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेचे कलम २.१.१, २.१.४ आणि २.४.४ नुसार कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेने नुकतीच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका १-३ अशी गमावली आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यातही हार पत्करली. आता गॉल येथे ६ नोव्हेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे.