सध्याच्या तरुणांमध्ये नाईट-आऊट ही संकल्पना आता चांगलीच परिचयाची झाली आहे. अनेकदा तरुण-तरुणी आपल्या मित्रांसोबत एखाद्या ठिकाणी जमून रात्र जागवत धमाल-मस्ती करतात. मात्र अशाच प्रकारे नाईट-आऊट करणं श्रीलंकेच्या खेळाडूला चांगलचं महागात पडलं आहे. नाईट-आऊटचं कारण देत ठरलेल्या वेळेत हॉटेलवर न परतल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने जेफ्री वांडरसेला एका वर्षासाठी निलंबीत केलं आहे.

EspnCricinfo या संकेतस्थळाने दिलेलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील सेंट लुशिया येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. नाईट-आऊट करताना ठराविक वेळेत हॉटेलमध्ये न परतल्याने वांडरसेला निलंबनाच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या शिक्षेची माहिती दिली आहे.

वर्षभराच्या काळात फिरकीपटू वांडरसे श्रीलंकेकडून कोणत्याही प्रकारे क्रिकेट खेळू शकणार नाहीये. संघाची शिस्त मोडणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर कठोर कारवाई करण्याचा पवित्रा लंकन क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. त्यात नाईट-आऊटसारख्या ठिकाणी क्रिकेटपटू चुकीच्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते, यासाठी जेफ्री वांडरसेला निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.