श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी) अलिकडच्या काळात बर्‍याच कारणांमुळे चर्चेत आले आहे. केवळ संघाची कामगिरीच नव्हे, तर बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील कराराचा वादही चर्चेत आहे. यामुळे खेळाडूंना मालिकेच्या आधारावर करार करण्यास भाग पाडले गेले आहे. यामुळे खेळाडूंना त्रास होत आहे. वार्षिक कराराच्या बाबतीत असे काहीही नव्हते. अहवालानुसार, करार नसल्यामुळे खेळाडूंना ईएमआय भरणेही अवघड होत आहे.

संडे मॉर्निंगमधील एका वृत्तानुसार, खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून त्यांना मागील थकबाकी भरण्यासाठी व कराराचा सन्मान करण्यास सांगितले आहे. ”नवीन करारामुळे जानेवारी २०२१पासून आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही”, असे खेळाडूंच्या वतीने सांगण्यात आले आहे. नवीन कराराबाबत खेळाडू अस्पष्ट आहेत. याची त्यांना लेखी माहिती हवी आहे. नव्या कराराअंतर्गत खेळाडूंच्या पगारामध्ये ३० टक्के कपात केली जात आहे.

वरिष्ठ खेळाडू आणि बोर्ड यांच्यात कनिष्ठ खेळाडू आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वार्षिक कराराअभावी खेळाडूंना वाईट फटका बसला आहे. त्यांना घराचा हप्ता आणि विमा देखील भरणेही अवघड जात आहे. काहींनी त्यांचे विवाह देखील थांबवले आहेत.

हेही वाचा – अटक झाली राज कुंद्राला आणि ट्रोल होतोय अजिंक्य रहाणे; जाणून घ्या कारण

अलीकडेच माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरननेदेखील कराराच्या वादासंबंधित प्रतिक्रिया दिली होती. करारातील वादात त्यांनी हे प्रकरण समजून घ्यावे आणि पैशावर अडकू नये, असे मुरलीधरनने वरिष्ठ खेळाडूंना सांगितले होते. हा करार घेण्यास नकार दिल्यानंतर मालिकेच्या आधारे खेळाडूंसाठी करार केला गेला असल्याचे मुरलीधरनने सांगितले.

दिमुथ करुणारत्ने आणि अँजेलो मॅथ्यूज यांनीही मुरलीधरनच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली. ”आमचा द्वेष करण्यात येत आहे पण ही पैशाची बाब नाहीये. त्यांनी मुरलीधरनला खरी गोष्ट सांगितली नसेल”, असे या दोघांनी एका पत्रात म्हटले होते.