निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा

यजमान श्रीलंकेचा संघ बांगलादेशवरील आपले वर्चस्व निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या सामन्यात कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताला आश्चर्यकारकरीत्या नमवणाऱ्या श्रीलंकेचा आत्मविश्वास उंचावला आहे. कुशल परेराच्या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने भारताचे १७५ धावांचे लक्ष्य आरामात पेलले. याचप्रमाणे बांगलादेशविरुद्धची त्यांची सध्याची कामगिरी ही चांगली आहे. कसोटी आणि तिरंगी ट्वेन्टी-२० स्पर्धेचा त्याचा प्रत्यय आला होता.

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार दिनेश चंडिमलने विजयाचे श्रेय प्रशिक्षक चंडिका हथुरासिंघाला दिले होते. हथुरासिंघा आधी बांगलादेशचे प्रशिक्षक होते.

शकिब अल हसनच्या अनुपस्थितीत बांगलादेशचा संघ भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीत झगडताना आढळला. रुबेल हुसेनने दोन बळी घेत अप्रतिम गोलंदाजी केली.

संघ

श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), सुरंगा लकमल (उपकर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, दसून शनाका, कुशल जनिथ परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उडाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, न्यूवान प्रदीप, दुष्मंता चामिरा, धनंजया डी’सिल्व्हा.

बांगलादेश : महमदुल्ला (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रुल कायेस, मुशफिकर रहिम (यष्टिरक्षक), शब्बीर रेहमान, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसेन, तस्कीन अहमद, अबू हिदर, अबू जायेद, अरिफूल हक, नझ्मूल इस्लाम, नुरूल हसन, मेहिदी हसन, लिटन दास.

सामन्याची वेळ : सायं. ७ वा.

थेट प्रक्षेपण : डीस्पोर्ट्स, जिओ टीव्ही अ‍ॅप, रिश्ते सिनेप्लेक्स.