मुंबईच्या वानखेडे मैदानावर २०११ झाली भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप, लंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला होता. यानंतर क्रीडा विश्वात एकच खळबळ माजली होती. लंकेच्या तत्कालीन संघाचा कर्णधार कुमार संगकारा आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलेल्या महेला जयवर्धनेने माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेचे सध्याचे क्रीडामंत्री डल्लास अलाहपेरुमा यांनी माजी क्रीडामंत्री अलुथगमगे यांच्या आरोपांची दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करुन दोन आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडामंत्र्यांच्या आदेशावरुन क्रीडा विभागाचे सचिव रुवानचंद्रा यांनी क्रीडा मंत्रालयाच्या तपास पथकाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

जाणून घ्या माजी क्रीडामंत्र्यांनी काय आरोप केले होते??

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.” News 1st वृत्तवाहिनीशी बोलताना अलुथगमगे यांनी हा आरोप केला होता.

या आरोपांवर आपली बाजू मांडत असताना, महेला जयवर्धनेने निवडणुका जवळ आल्या आहेत का?? कारण सर्कस सुरु झाली आहे असं खोचक ट्विट केलं होतं. तसेच तत्कालीन कर्णधार कुमार संगकारानेही याप्रकरणाची चौकशी करुन अलुथगमगे यांनी पुरावे सादर करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे याप्रकरणी श्रीलंकन सरकार आता काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.