दीपक जोशी

१९७५पासून १२ विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये खेळणारा श्रीलंकेचा संघ मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध लढतीच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करणार आहे. विश्वचषकात ७५ सामन्यांचा आकडा पार करणारा तो दुसरा आशियाई संघ ठरणार आहे. विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांचा क्रम लावल्यास ऑस्ट्रेलिया (८५ सामने), न्यूझीलंड (८० सामने) हे पहिल्या दोन स्थानांवर आहेत. त्याखालोखाल भारत (७५ सामने), इंग्लंड (७३ सामने) व पाकिस्तान व वेस्ट इंडिज (प्रत्येकी ७२ सामने) यांचे क्रमांक लागतात. कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणारा लंकेचा लसिथ मलिंगाच्या खात्यावर २४ सामन्यांत ४३ बळी जमा आहेत. झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी विश्वचषकात प्रत्येकी ४४ बळी घेतले आहेत. त्यामुळे दोन बळी घेऊन त्यांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी त्याला असेल. याचप्रमाणे २१९व्या सामन्यात सव्वातीनशे बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला तीन बळींची आवश्यकता आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन (५३४ बळी) आणि चामिंडा वास (३९९) यांच्या नावावर मलिंगापेक्षा अधिक बळी जमा आहेत.