‘‘कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्यानंतर श्रीलंकेच्या संघाची धुरा सांभाळणाऱ्या नव्या दमाच्या फलंदाजांचा गृहपाठ परिपक्व झालेला नाही. म्हणूनच भारताच्या अमित मिश्रा व रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकी माऱ्यासमोर त्यांची त्रेधातिरपीट उडाली,’’ असे परखड मत श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने व्यक्त केले.
जयसूर्या पुढे म्हणाला, ‘‘आशियाई उपखंडातील फलंदाज फिरकीचा सामना समर्थपणे करू शकतात, हे श्रीलंकेच्या फलंदाजांना लागू होत नाही. अश्विनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. मालिकेतील त्याची आकडेवारी श्रीलंकेच्या फलंदाजांचे त्याचा सामना करतानाचे अपयश स्पष्ट करणारी आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. मात्र दुसऱ्या कसोटीत त्यांनी भारताच्या फिरकीसमोर हाराकिरी पत्करली.’’
‘‘दोन्ही संघांसाठी ही खडतर मालिका आहे. मैदानांचा आकार मोठा नाही व खेळपट्टय़ा भरपूर धावा करण्यासाठी अनुकूल नाहीत, मात्र तरीही फलंदाजांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ही गोष्ट सकारात्मक आहे,’’ असे जयसूर्याने सांगितले.
जयसूर्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. विराटने नुकतीच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, तरीही त्याची कामगिरी उत्तम आहे. पाच गोलंदाजानिशी खेळण्याचे धोरण खेळपट्टीच्या स्वरुपावर अवलंबून असते. संगकाराच्या निवृत्तीबाबत विचारले असता जयसूर्या म्हणाला, ‘‘अशा अनुभवी खेळांडूची जागा भरून काढणे अशक्य आहे. मात्र हीच लहिरू थिरिमाने आणि दिनेश चंडिमलसारख्या युवा खेळाडूंना सर्वोत्तम संधी आहे.’’