19 February 2019

News Flash

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

पहिला गेम २१-१९ असा जिंकत सातव्या मानांकित श्रीकांतने विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या.

तीन गेमपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या मॅरेथॉन संघर्षांनंतर किदम्बी श्रीकांतचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. श्रीकांतने लीकडून पत्करलेला हा दुसरा पराभव आहे. याआधी २०१६च्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तो पराभूत झाला होता.

पहिला गेम २१-१९ असा जिंकत सातव्या मानांकित श्रीकांतने विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र कोरियाच्या ली डाँग कीऊनने पुढील दोन गेम २१-१६, २१-१८ असे जिंकत एकंदर एक तास आणि १९ मिनिटांत सामन्यावर वर्चस्व मिळवले.

जागतिक बॅडिमटन क्रमवारीतील माजी अव्वल स्थानावरील श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या वाँग विंग कि व्हिन्सेंटचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला होता.

उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरुवातीपासूनच रंगतदार ठरला. पहिल्या गेममध्ये प्रारंभी २-४ अशा पिछाडीवर पडलेल्या श्रीकांतने ९-५ अशी आघाडी घेतली. मग ली यानेही १०-१० असे त्याला बरोबरीत गाठले. नंतर श्रीकांतने १९-१७ अशी आघाडी घेतल्यावर पुन्हा ली याने बरोबरी साधली. परंतु श्रीकांतने पहिला गेम जिंकण्यात यश मिळवले.

दुसऱ्या गेममध्ये ली हा अतिशय सकारात्मक पद्धतीने खेळला. त्यामुळे १२-५ अशी आघाडी त्याला मिळवता आली. श्रीकांतने पुनरागमनासाठी जोमाने प्रयत्न केले. परंतु ली याने त्याचे प्रयत्न हाणून पाडले.

निर्णायक गेमध्ये ली याने १२-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांत चार सलग गुण मिळवत १३-१२ अशी मुसंडी मारली. मग ली यानेही १४-१४ अशी बरोबरी साधली. नंतर मात्र ली याने आत्मविश्वासाने खेळत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.

श्रीकांतच्या पराभवानिशी जपान खुल्या स्पर्धेतील भारताची वाटचाल संपुष्टात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले आहेत. पुरुष दुहेरीतही मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी उपउपांत्यपूर्व फेरीचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरले.

First Published on September 15, 2018 2:33 am

Web Title: srikanth kidambi out indias campaign ends in japan open