बी. साईप्रणीत व श्रीकांत यांच्यात आज अंतिम लढत

भारताच्या बी. साईप्रणीतने वर्चस्वपूर्ण खेळ करताना अवघ्या ३८ मिनिटांत कोरियाच्या ली डाँग- केयूनवर सरळ गेममध्ये मात करीत कारकीर्दीत प्रथमच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंगापूर सुपर सीरिज स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रणीतने २१-६, २१-८ असा सोपा विजय मिळवला. जेतेपदासाठी त्याच्यासमोर सहकारी किदम्बी श्रीकांतचे आव्हान आहे. इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका जिंटिंगवर मात करीत श्रीकांतने प्रथमच या स्पध्रेची अंतिम फेरी गाठली. प्रणीत आणि श्रीकांत यांच्यातील अंतिम सामन्यामुळे जेतेपद भारताकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

प्रणीतने जानेवारीत झालेल्या सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर सिंगापूर येथे झंझावाती खेळाचा सपाटा लावताना त्याने शनिवारी तीन वेळा कोरिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या लीचा सहज पराभव केला. हैदराबादच्या या २४ वर्षीय खेळाडूने गतवर्षी कॅना खुली स्पर्धा जिंकली होती.

प्रणीतने कारकीर्दीत अनेक धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. यामध्ये २००३च्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेतील विजेत्या मुहम्मद हाफिझ, माजी विश्व आणि ऑलिम्पिक विजेता हाशिम आणि तीन ऑलिम्पिक रौप्यपदके नावावर असलेला व जागतिक क्रमवारीत अव्वल ली चाँग वेई यांच्याविरुद्धच्या विजयांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीकांतने जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या जिंटिंगवर ४२ मिनिटांच्या खेळात २१-१३, २१-१४ असा विजय मिळवला. या विजयाबरोबर श्रीकांतने जिंटिंगविरुद्धची जय-पराजयाची आकडेवारी २-१ अशी वाढवली. मात्र प्रणीतविरुद्धच्या आकडेवारीत श्रीकांत ४-१ असा पिछाडीवर आहे.

कॅरोलीन मारिन अंतिम फेरीत

महिला एकेरीत स्पेनच्या कॅरोलीन मारिनने सलग तिसऱ्यांदा सुपर सीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने कोरियाच्या संग जी ह्यूनवर २१-९, २१-१२ अशी मात केली. अंतिम फेरीत तिच्यासमोर चायनीज तैपेइच्या टॅल झू यिंगचे आव्हान आहे. यिंगने २१-१९, २१-१५ अशा फरकाने अमेरिकेच्या बेईवेन झँगला नमवले.

  • भारताच्या इतिहासात सुपर सीरिज स्पध्रेच्या जेतेपदासाठी पहिल्यांदा दोन भारतीय एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
  • आत्तापर्यंत सुपर सीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीत चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्क या तीन देशांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.