भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतसह ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीच्या सलामीच्या फेरीत बुधवारी जर्मनीच्या फॅबियन रॉथने दुखापतीमुळे माघार घेतल्याने श्रीकांतला पुढे चाल देण्यात आली. त्या वेळी श्रीकांत ३-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत त्याची गाठ हाँगकाँगच्या वोंग विंग की व्हिन्सेंटशी पडेल. महिला एकेरीत सिंधूने स्पेनच्या बीट्रिझ कॉरेलीसवर २१-१९, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात केली. दुसऱ्या फेरीत ती जपानच्या सायका ताकाहाशीशी दोन हात करेल.

पुरुष दुहेरीत सत्त्विकराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने सलामीचा अडथळा पार केला. भारताच्या जोडीने फ्रान्सच्या बॅस्टियन केरसॉडी आणि ज्युलियन मेईओवर २१-१२, २१-१४ असा विजय मिळवला. सत्त्विकराज आणि चिरागसमोर डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित मॅड्स कॉनरॅड-पीटरसन आणि मॅड्स पिएलर कोल्डिंग जोडीचे आव्हान असेल.

जागतिक क्रमवारीमध्ये श्रीकांत चौथ्या स्थानी

श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीची ताजी यादी गुरुवारी जाहीर झाली. त्यात त्याने अव्वल पाच बॅडिमटनपटूंमध्ये स्थान मिळवले. डेन्मार्क खुली, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया खुली अशा तीन सुपर सीरिज स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतने यंदाच्या हंगामातील ११ स्पर्धातून ६६,९२३ गुण मिळवलेत. जागतिक क्रमवारीतील श्रीकांतची सर्वोत्तम कामगिरी ही क्रमवारीतील तिसरे स्थान आहे. जून २०१५मध्ये त्याने तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती.