डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा

डेन्मार्कच्या सोलबर्ग विट्टींघसचे आव्हान मोडीत काढत आगेकूच

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतने पहिल्या लढतीत हॅन्स-ख्रिस्तियान सोलबर्ग विट्टींघस याच्यावर सहज मात करत डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली. मात्र दुसऱ्या फेरीत भारताच्या श्रीकांतला महान खेळाडू लिन डॅन याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.

श्रीकांतला डेन्मार्कच्या विट्टींघसचे आव्हान मोडीत काढण्यासाठी फक्त ३५ मिनिटे संघर्ष करावा लागला. श्रीकांतने सलामीच्या लढतीत २१-१६, २१-१० अशी बाजी मारत आगेकूच केली. श्रीकांत आणि लिन डॅन यापूर्वी चार वेळा एकमेकांशी भिडले असून श्रीकांतला तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे; पण लिन डॅनच्या फटक्यांमध्ये पूर्वीप्रमाणे धार राहिलेली नाही. पूर्वी जागतिक क्रमवारीवर अधिराज्य गाजविणारा लिन डॅन आता १४व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. २०१४ मध्ये श्रीकांतने लिन डॅनला चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हरवले होते. श्रीकांतने डॅनचे आव्हान पार केले आणि समीर वर्माने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनाथन ख्रिस्तीला हरवले तर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीची लढत दोन भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये रंगेल.

दरम्यान, महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी दुसऱ्या फेरीत मजल मारली असली तरी मेघना जक्कामपुडी आणि एस. राम पूर्वीशा यांना सलामीलाच हार स्वीकारावी लागली. अश्विनी-रेड्डी जोडीने अमेरिकेच्या एरियल ली आणि सिडनी ली या बहिणींना २१-७, २१-११ अशी सहजपणे धूळ चारली. मेघना-पूर्वीशा जोडीला स्वीडनच्या एम्मा कार्लसन आणि योहाना मॅग्नूसन यांनी १७-२१, ११-२१ असे हरवले.

एकदाच विजय

श्रीकांत आणि लीन डॅन यांच्यात यापूर्वी झालेल्या चार लढतींपैकी तीन लढतींमध्ये डॅननेच बाजी मारली आहे.  श्रीकांतला केवळ एकदाच २०१४ च्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याला पराभूत करण्यात यश मिळाले होते. डॅन हा माजी जगज्जेता आणि माजी अग्रमानांकीत असला तरी आता वयाच्या पस्तिशीत असल्याने ही लढत रंजक होऊ शकते.