भारताविरुद्धची तीन सामन्याची टी २० मालिका श्रीलंकेने २-१ ने जिंकली. श्रीलंकेनं ७ गडी आणि ३३ चेंडू राखून सामना जिंकला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८१ धावांवर रोखण्यात श्रीलंकन संघाला यश आलं. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाही. ८ गडी गमवून भारताने ८१ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी ८२ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेनं हे आव्हान ३ गमवून सहज गाठलं. श्रीलंकेनं भारताविरुद्ध पहिली टी २० मालिका जिंकली आहे. पहिला टी २० सामना भारताने ३८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारताला ४ गडी राखून पराभूत केलं होतं.

श्रीलंकेचा डाव

भारताने ठेवलेलं ८२ धावांचं लक्ष्य सोपं असल्याने श्रीलंकन फलंदाजांवर दडपण नव्हतं. अविष्का फर्नांडो आमि मिनोद भानुका या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. संघाची धावसंख्या २३ असताना श्रीलंकेला पहिला धक्का बसला. फर्नांडो चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १८ चेंडूत १२ धावा केल्या. त्यांतर मिनोद भानुका जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. राहुल चहरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर सदीरा आणि धनंजया डिसिल्वा या जोडीनं विजय सोपा केला. संघाची धावसंख्या ५६ असताना सदीरा बाद झाला. त्यानंतर डिसिल्वा आणि हसरंगा जोडीनं श्रीलंकेला विजय मिळवून दिला. भारताकडून राहुल चहरने ४ षटकात १५ धावा देत ३ गडी बाद केले. मात्र इतर गोलंदाजांना श्रीलंकेचा एकही फलंदाज बाद करता आला नाही.

भारताचा डाव

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारताचा कर्णधार शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकात चमीराच्या गोलंदाजीवर धनंजया डि सिल्वा हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संघाच्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल बाद झाला. संघाच्या २४ धावा असताना संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायवाडही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या वैयक्तिक १४ धावा असताना हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. नितीश राणाही भारता डाव सावरू शकला नाही. दासून शनाकाने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमार १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर चहर ५ धावा करून तंबूत परतला. तर वरुण चक्रवर्थी खातंही खोलू शकला नाही.

भारताची हाराकिरी; १० षटकातील धावसंख्येच्या नीचांकाची नोंद

तिसऱ्या निर्णायक सामन्यात हसरंगाने दमदार कामगिरी केली. या अटीतटीच्या सामन्यात हसरंगाने आपल्या भेदक गोलदांजीचं प्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आज हसरंगाचा वाढदिवस असल्याने ही कामगिरी त्याच्या स्मरणात राहणार आहे. त्याने भारताचे चार गडी बाद करत भारताला ८१ या धावसंख्येवर रोखलं. त्याने चार षटकात केवळ ९ धावा दिल्या आणि महत्त्वाचे ४ खेळाडू बाद केले. हसरंगाने ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार आणि वरूण चक्रवर्थीला तंबूचा रस्ता दाखवला. .