बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मेयप्पन याचा स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याची कबुली अभिनेता विंदू दारा सिंगने पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण देशाला श्रीनिवासन यांच्याकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे. मात्र श्रीनिवासन यांनी स्वत:च्या मालकीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी बीसीसीआयच्या नियमांचे पुस्तकच बदलल्याची माहिती समोर आली आहे.
२००८ मध्ये बीसीसीआयचे खजिनदार असतानाच श्रीनिवासन अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकले होते. खजिनदार असताना आयपीएल फ्रँचायझी विकत घेण्यासाठी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या आचारसंहितेत बदल करवून घेतले. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याला संघ विकत घेता येत नसल्यामुळे त्यांनी नियम बदलले होते, असा आरोप त्या वेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांनी केला होता. त्याचबरोबर स्वत:च्या फायद्यासाठी श्रीनिवासन यांनी आपल्या मालकीच्या इंडिया सीमेंट्स कंपनीच्या सीईओपदी जावई गुरुनाथ याची, तर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. बीसीसीआयचे निवड समिती अध्यक्ष असतानाही कृष्णम्माचारी श्रीकांत यांची चेन्नई संघाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून श्रीनिवासन यांनी नियुक्ती केली होती. धोनीला करारबद्ध करताना श्रीनिवासन यांनी कराराच्या नियमांचा भंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांसाठी श्रीनिवासन यांनी काही विशिष्ट पंचांची नियुक्ती केली होती, असा आरोप आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी केला होता.
बीसीसीआयच्या कार्यक्रमांत व्यावसायिक जाहिरातींबाबत खेळाडू, प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापक आणि संघ अधिकारी यांच्यासाठी कडक नियम होते. पण श्रीनिवासन आल्यानंतर त्यांनी सर्व नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत आपले नियम तयार केले. आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआयचे पदाधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या राखणाऱ्या श्रीनिवासन यांच्याविरोधात मुथय्या यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.