होंडुरासमधील फुटबॉल सामन्यासाठी भरगच्च भरलेल्या स्टेडियमवरील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अश्रुधुरांच्या फैरीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत चार चाहते आणि एक बाळ गर्भातच दगावले, तर २५ जण जखमी झाले आहेत.

रविवारी झालेल्या या चेंगराचेंगरीत गुदमरल्यामुळे चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांची हाडे मोडली. या धावपळीत गर्भवती माता जखमी झाली आणि तिचे बाळ गर्भातच दगावले, अशी माहिती विद्यापीठ हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने दिली.

राजधानी तेगुसिगल्पातील ३५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नॅशनल स्टेडियममध्ये मोटागुआ व होंडुरास प्रोग्रेसो संघांदरम्यान होणाऱ्या फुटबॉल सामन्याची हजारो तिकिटे विकली गेली होती. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने एका प्रवेशद्वारातून घुसण्यासाठी गर्दी केली असता ही दुर्घटना घडली. पोलिसांनी गर्दीवर अश्रुधुराच्या फैरी झाडल्या तसेच पाण्याचा मारा केला. त्यापासून बचाव करण्यासाठी लोक पळू लागले असता चेंगराचेंगरी झाली. सामना सुरू होत असतानाच स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ दोघे मृत्युमुखी पडले, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.