जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर आफ्रिदीने अनेकवेळा भडकाऊ भाषणं करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. शुक्रवारी पाक व्यप्त काश्मीरमध्ये(POK) एका रॅलीदरम्यान आफ्रिदीने भारताविरोधात चिथावणीखोर भाषण केलं आहे. “मी प्रत्येकवेळा काश्मीरबद्दल बोलतो कारण, माझ्या रक्तात आहे. आणि रक्तात का आहे? कारण आजाद काश्मीरमधील मोठ्या व्यक्तींनी माझ्या आजोबांना १९४९ मध्ये ‘गाझी ऐ काश्मीर’ ही पदवी दिली आहे. त्यामुळे मी काश्मीर सोबत आहे. मी पत्येक जालीमाच्या विरोधात आहे. अन्याय होणाऱ्या प्रत्याकाबरोबर मी आहे. अन्यय फक्त मुस्लमांनावरच का होतोय? असा प्रश्नही यावेळी विचारला आहे.” पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर जगभरात आवाज उठवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असंही तो म्हणाला.

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत आहे. आपल्या सगळ्यांना अधिक सावध राहायला हवं. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, तोपर्यंत आपल्यावर जुलूम होत राहणारच, असे आफ्रिदी म्हणाला आहे. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याची मागणीही यावेळी आफ्रिदीने केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर आफ्रिदी पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमधील रॅलीत सहभागी झाला होता. यावेळी त्याने मुस्लिमांना चिथावणी देणारं भाषण केलं.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आफ्रिदी सातत्यानं भारताविरोधात वक्तव्य करत आहे. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंही त्याला शाब्दिक चपराक लावली होती.