बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसन याने कोलकातामधील काली पूजेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याबद्दल त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. IANSच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सिल्हेटचा रहिवासी असलेल्या मोहसीन तालुकदार याने शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याने केला. तसेच शाकिबला ठार करण्यासाठी गरज पडल्यास सिल्हेटहून ढाक्यापर्यंत चालत येईन अशी धमकीही त्याने फेसबुक लाइव्हमधून दिली.

सिल्हेटचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त बीएम अशरफुल्ला ताहेर यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून फेसबुक लाइव्हची लिंक सायबर पोलिसांकडे तपासासाठी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सायबर फॉरेन्सिक विभागाकडे धमकीच्या व्हिडीओची लिंक सुपूर्द करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, असे ताहेर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या तालुकदारने घडलेल्या प्रकारानंतर काही वेळाने पुन्हा फेसबुक लाइव्ह करत धमकी देण्याबद्दल माफी मागितली. परंतु, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटी यांनी ‘योग्य मार्गा’चा अवलंब करावा यावरही त्याने जोर दिला. धमकी देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावरून काढून टाकण्यात आला आहे.