आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालेला स्टार फुटबॉलर झ्लाटन इब्राहिमोविच पुन्हा एकदा स्वीडनच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर इब्राहिमोविचचे स्वीडनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. फिफा 2022 वर्ल्डकपच्या पात्रता स्पर्धेसाठी त्याची संघात निवड झाली आहे.

इब्राहिमोविचने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. त्याने केलेल्या ट्विटमध्ये “द रिटर्न ऑफ गॉड”, असे लिहिले आहे. स्वीडन संघाला एस्टोनियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळायचा आहे. त्यानंतर फिफा 2022 वर्ल्डकपच्या पात्रता गटात त्यांना जॉर्जिया आणि कोसोवाविरुद्ध झुंजावे लागेल.

 

2001मध्ये स्वीडनकडून पदार्पण

फुटबॉलविश्वात ‘दादा’ खेळाडू म्हणून इब्राहिमोविचची ओळख आहे. अनेक सामन्यांदरम्यान तो प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत आक्रमक झाल्याचे आपण पाहिले आहे. इब्राहिमोविचने 2001मध्ये स्वीडनच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले. 2016च्या युरो स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती घेतली. त्याने आपल्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 116 सामन्यांत 62 गोल केले आहेत.

1999मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या मोठ्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर 2018मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.