स्टार स्पोटर्स इंडियाने तब्बल ६,१३८.१ कोटी रुपये मोजून बीसीसीआयकडून प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. पुढच्या पाचवर्षांसाठी भारतात होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकांचे प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोटर्सला मिळाले आहेत. सामन्याच्या प्रक्षेपणाचे टीव्ही आणि डिजिटल हक्क मिळवण्यासाठी मागच्या तीन दिवसांपासून ई-लिलाव प्रक्रिया सुरु होती.

सोनी आणि जियोला (रिलायन्स) मागे टाकून स्टार स्पोटर्स इंडियाने या लिलावात बाजी मारली. २०१८ ते २०२३ पर्यंत सामन्याच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोटर्सकडे असतील. स्टारने यापूर्वी ३८५१ कोटी रुपये मोजून २०१२ ते २०१८ पर्यंतच्या भारतातील क्रिकेट सामन्यांचे प्रसारण अधिकार मिळवले होते.

क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रिमियर लीगचे प्रसारण हक्क स्टार इंडियाला तब्बल २.५२ अब्ज डॉलरना विकले होते.

२०१८ ते २०२३ दरम्यान भारतात होणाऱ्या १०२ सामन्यांचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी सुरुवातीला फेसबुक, गुगल या कंपन्यांनीही अर्ज केले होते. पण छाननी प्रक्रियेत स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या ऑनलाइन लिलावात बोली लावण्यासाठी पात्र ठरल्या.