हॉकीच्या माजी कर्णधाराचा भारतीय संघाला सल्ला

भुवनेश्वरला सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने सुरुवात चांगली केली आहे. आता हीच लय कायम राखत सांघिक खेळावर भर द्यायला हवा, असा सल्ला माजी कर्णधार सरदार सिंग यांनी भारतीय हॉकी संघाला दिला आहे.

विश्वचषकामध्ये बेल्जियम, हॉलंड, जर्मनी, अर्जेटिना आणि ऑस्ट्रेलिया हे उत्तम दर्जाचे संघ आहेत. त्या संघांच्या बरोबरीने कामगिरी करण्यासाठी भारताला हीच लय आणि ऊर्जा कायम ठेवत खेळ करावा लागेल.

विश्वचषकात क-गटातील आपल्या अभियानाचा प्रारंभ भारताने दक्षिण आफ्रिका संघाला ५-० अशा मोठय़ा फरकाने हरवून केला. तसेच बेल्जियमसारख्या तगडय़ा संघाला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर सरदार सिंग यांनी पुढील आव्हानांचा उल्लेख केला.

‘‘भारताने या स्पर्धेत केवळ दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून न राहता सांघिक स्तरावर प्रतिस्पध्र्याचा मुकाबला करणे आवश्यक आहे. विश्वचषक किंवा ऑलिम्पिक यांच्यासारख्या सामन्यांमध्ये केवळ मनप्रीत किंवा पी.आर. श्रीजेश यांच्यासारखे खेळाडू खेळून चालणार नाही, तर संपूर्ण संघाने एकदिलाने प्रयत्न करायला हवे,’’ असे एका कार्यक्रमासाठी मुंबईत आलेल्या सरदार सिंग यांनी सांगितले.

‘‘उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपल्यासाठी खूप आव्हानात्मक असेल. गेल्या दशकभरात प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी प्रशिक्षणात खूप प्रगती साधली असून भारतासाठी ते सध्या सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत, तर कर्णधार श्रीजेश हा जगातल्या सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक आहे,’’ असेही सरदार सिंग यांनी नमूद केले.