शिवछत्रपती क्रीडानगरीत अकादमी सुरू करण्यासाठी केवळ वैयक्तिक संघटकांना संधी न देता विविध खेळांच्या राज्य संघटनांनाही ही संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) कार्यकारिणीत करण्यात आली आहे.
संघटनेची बैठक चंद्रकांत शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली येथे घेण्यात आली. त्यामध्ये विविध खेळांच्या संघटनांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात एमओएचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले, विविध खेळांमधील अनुभवी खेळाडूंना किंवा प्रशिक्षकांना अकादमी सुरू करण्यासाठी क्रीडानगरी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र याबाबत कोणतीही निविदा न काढता व उच्चस्तरीय समितीची बैठक न घेताच अकरा महिने कराराने अकादमीकरिता जागा देण्यात आल्या आहेत. अशीच संधी अन्य खेळाडूंनाही दिली पाहिजे. तसेच अन्य खेळांच्याही अकादमी सुरू करण्यासाठी येथे संधी दिली पाहिजे अशी मागणीही एमओएच्या बैठकीत विविध संघटकांनी केली आहे. महाराष्ट्रात कुस्ती, जलतरण, अ‍ॅथलेटिक्स आदी अन्य खेळांमध्येही पदक मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. हे लक्षात घेऊन शासनाने अन्य खेळांच्या अकादमी येथे सुरू कराव्यात. त्याकरिता विविध प्रशिक्षक व अन्य सहकार्य करण्याची आमची तयारी आहे असे सांगून लांडगे म्हणाले, अकादमीकरिता जागा देण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्याची आवश्यकता आहे. विविध क्रीडा संघटनांचे प्रश्न सोडविण्याकरिता एमओएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर्शविली आहे.