पुरूष गटात सांगलीला उपविजेतेपद; महिलांच्या गटामध्ये उपनगरला नमवून पुणे संघाला विजेतेपद

सुल्तान डांगे आणि मोबिन शेख या परजिल्ह्यातील खेळाडूंना आयात करून रायगडने बलाढय़ सांगलीचा ४०-३५ असा पराभव करून तब्बल १७ वर्षांनी राज्य अजिंक्यपदाला गवसणी घातली. महिलांमध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या पुण्याने गतवर्षीच्या पराभवाचे उट्टे फेडताना मुंबई उपनगरचा ३३-२३ असा पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात सांगलीने मध्यंतराला २२-२० अशी माफक आघाडी घेतली होती. उत्तरार्धातसुद्धा ही उत्कंठा टिकून राहिली. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना अनुभवी खेळाडू नितीन मदनेला गैरवर्तणुकीबद्दल पिवळे कार्ड दाखवण्यात आले. मात्र रायगडच्या विजयात पाच अव्वल पकडींचा सिंहाचा वाटा होता. यापैकी दोन पकडी संकेत बनकरने केल्या. याशिवाय मितेश पाटीलने अष्टपैलू खेळ दाखवताना तीन पकडी केल्या आणि तीन बोनस गुण मिळवले. सुल्तानने चढायांचे सहा गुण मिळवले, तर नितीन थळेने चार गुण मिळवले. सांगलीच्या राहुल वडारने दमदार चढाया करीत सहा गुण मिळवले. नितीननेही चढायांचे सात गुण मिळवले, मात्र त्याच्या चार वेळा पकडी झाल्या.

महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने पहिल्या सत्रात १०-८ अशी नाममात्र आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सत्रात सामन्याची रंगत अधिक वाढली. दुसऱ्या सत्राच्या पाचव्या मिनिटाला पुण्याने पहिला लोण चढवून २०-९ अशी आघाडी घेतली, परंतु उपनगरने चार मिनिटांत लोण परतवून आघाडी २२-२० अशी कमी केली. मग उर्वरित चार मिनिटांत पुण्याने सामन्यावरील पकड निसटवून न देता आणखी एक लोण दिला.

पुण्याची मदार प्रामुख्याने मागील वर्षी दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या दीपिका जोसेफवर होती. मात्र उपनगरने दीपिकासाठी अचूक रणनीती आखली. परंतु पुण्याच्या संघातील सांघिक योगदानापुढे उपनगरचा निभाव लागला नाही. दीपिकाला चढायांचे तीन गुण मिळाले, तर तिची तीनदा पकड झाली. स्नेहल शिंदेने चढायांमध्ये सर्वाधिक पाच गुण मिळवले. सायली केरिपाळेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. याचप्रमाणे अंकिता जगतापने पकडींचे तीन गुण मिळवले.

उपनगरच्या चढायांची भिस्त कोमल देवकरवर आणि पकडींची राणी उपहारवर होती. कोमलने चढायांमध्ये ९ गुण मिळवले, परंतु तिची सहा वेळा पकड झाली. याशिवाय राणी उपहारने तीन अप्रतिम पकडी केल्या.

मैदानावर चढाईपटूंना फारशी साथ मिळत नव्हती, तर क्षेत्ररक्षणाला योग्य वाव होता. याचप्रमाणे उपनगरची महत्त्वाची खेळाडू कोमल देवकरसाठी आम्ही अचूक रणनीती आखली. सायली, दीपिका आणि स्नेहल हे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू संघात असल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. उपनगरच्या कोणत्याही यशस्वी चढाईला फार गुण जाऊ नये, याची आम्ही काळजी घेतली.         – मोहिनी चाफेकर-जोग, पुण्याच्या प्रशिक्षक