कुमारांमध्ये पुण्याला विजेतेपद, अश्विनी मोरे सर्वोत्तम खेळाडू

मंचर येथे झालेल्या ४६ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. कुमारांमध्ये नाशिकचा दिलीप खांडवी तर मुलींमध्ये ठाण्याची अश्विनी मोरे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

मुलींच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा ९-८ (५-३, ४-५) असा अतिशय अटीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. ठाण्याच्या अश्विनी मोरेने ३:३०, २:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:२०, २:०० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले. पुण्याच्या स्नेहल जाधवने १:५०, ३:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले. ऋतुजा भोरने २:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेत जोरदार लढत दिली, मात्र शेवटच्या क्षणी ठाण्याने बाजी मारली. मुलींमध्ये पुण्याची स्नेहल जाधव सर्वोत्तम आक्रमक खेळाडू तर ठाण्याची रेश्मा राठोड सर्वोत्तम संरक्षक पुरस्काराची मानकरी ठरली.

कुमारांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिकवर १८-१४ असा विजय संपादन केला. पुण्याच्या राहुल मंडलने २:००, २:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले. संदेश जाधवने २:००, १:३० मि. संरक्षण आणि चार गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली.  पुण्याच्या राहुल मंडलने सर्वोत्तम संरक्षकाचा तर संदेश जाधवने सर्वोत्तम आक्रमक खेळाडूचा पुरस्कार पटकावला.