विश्वविजेत्या कॅरमपटूंची अपेक्षा

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील अद्भुत कामगिरीमुळे सर्व ठिकाणी सत्कार होतच आहेत, पण अजूनही राज्य सरकारने कौतुकाची थाप पाठीवर दिलेली नाही, अशी खंत विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांनीही व्यक्त केली. विश्वविजेता प्रशांत मोरे याच्यासह भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. या वेळी या साऱ्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. या वेळी दोन्ही संघटनांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक संघांना दिले.

‘‘एखादा क्रिकेटपटू किंवा अन्य खेळातील खेळाडू जर विश्वविजेतेपद जिंकून भारतात आला असता तर त्याच्यावर सत्कारांचा वर्षांव झाला असतात. प्रशांत मोरे हा कॅरम खेळतो हा त्याचा दोष आहे की खेळाचा? विश्विजेता हा शेवटी जगातील अव्वल खेळाडू असतो. त्याच्यासह संघातील जवळपास पाच खेळाडू आणि मीदेखील महाराष्ट्राचे आहोत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अजून दखल घेतली नाही, हे पाहून फार वाईट वाटते,’’ असे मत प्रशिक्षक अरुण केदार यांनी व्यक्त केले. याबाबत विश्वविजेता प्रशांत मोरे म्हणाला की, ‘‘या मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावणे ही साऱ्यांसाठीच अभिमानाची बाब आहे; पण याची दखल राज्य सरकार घेत नसल्याची सल मनात आहे. या स्पर्धामध्ये कोणतेही रोख पारितोषिक मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आमचा योग्य तो गौरव करावा, हीच अपेक्षा आहे.’’

विश्वविजेत्या स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारा संदीप देवरुखकर या वेळी म्हणाला की, ‘‘राज्य सरकारने आतापर्यंत आमची कोणतीच दखल घेतली नाही, हे एक खेळाडू म्हणून नक्कीच वाईट वाटते; पण आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही.’’

माजी विश्वविजेता आणि या वेळी पुरुष एकेरीमध्ये तिसरा क्रमांक पटकावणारा योगेश परदेशी म्हणाला की, ‘‘आम्हाला प्रोत्साहनाची गरज आहे. राज्य सरकारने कौतुकाची थाप देणे, यापेक्षा जास्त प्रोत्साहन काय असू शकते. त्यामुळे राज्य सरकार आमचा योग्य तो सन्मान करेल, अशी आशा मला आहे.’’

महिला दुहेरीमध्ये अजिंक्यपद पटकावणाऱ्या काजल कुमारीने सांगितले की, ‘‘कॅरममध्ये जवळपास सर्वच मध्यमवर्गीय स्तरातले असतात. त्यांनाच या स्पर्धासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी. सरतेशेवटी आम्ही भारतासाठी जेतेपद पटकावले आहे, याचा विचार त्यांनी करायला हवा.’’

नागरी सत्कार करणार

विश्वविजेत्या प्रशांत मोरेसह त्यांच्या पूर्ण संघाचा नागरी सत्कार करण्याची ग्वाही, मी या वेळी देते, असे आश्वासन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी या वेळी दिले.