अहमदनगर : मुंबई उपनगर, कोल्हापूर या संघांनी ३१व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत बाद फेरीत प्रवेश केला. याचप्रमाणे रत्नागिरी, परभणी, सांगली, अहमदनगर, मुंबई शहर, ठाणे यांनी किशोर गटात, तर सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे यांनी किशोरी गटाची बाद फेरी गाठली.

रेसिडेंसियल हायस्कूलच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या क-गटात रायगडने मुंबई शहरला ४१-३५ अशी धूळ चारली. या सलग दुसऱ्या पराभवामुळे मुंबईचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मुंबईने सलग ३ गुण घेत सुरुवात झोकात केली होती, पण त्यांना याचा शेवट गोड करणे जमले नाही. रायगडने या धक्क्यातून सावरत मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. रश्मी पाटील, रूपा पाटील या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. मुंबईच्या रिद्दी हडकरने एकाकी झुंज दिली. रायगडने शेवटच्या साखळी सामन्यात सिंधुदुर्गला २५-२४ असे नमवत गटात अग्रक्रम पटकावला, तर सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

रश्मी पाटील रायगडकडून, तर वैष्णवी सावंत, समृद्धी भगत सिंधुदुर्गकडून उत्कृष्ट खेळल्या. इ-गटात परभणीने सांगलीला ३१-३१ असे बरोबरीत रोखले. मध्यंतराला सांगलीकडे १३-१२ अशी आघाडी होती. पूजा शिंदे, श्रद्धा माळी सांगलीकडून, तर गौरी हाडे, गीता तुरे परभणीकडून उत्तम खेळल्या.

मुलांच्या क-गटात यजमान अहमदनगरने मुंबई शहरला ३१-२२ असे नमवत या गटात प्रथम क्रमांक मिळवला. नगरच्या सचिन म्हसरुपे, संकेत खलाटे यांनी आक्रमक सुरुवात करीत मुंबईवर दोन लोण देत विश्रांतीलाच २३-६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. विश्रांतीनंतर संयमी खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईकडून करण रावत, रुपेश साळुंखे यांनी जोरदार खेळ करत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. फ-गटात पुण्याने नांदेडला ४४-३८ असे नमवले. अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात पहिल्या डावात पुणे १८-१९ असे पिछाडीवर पडले होते. पण दुसऱ्या डावात पुण्याने दिमाखदार खेळासह सामना आपल्या खिशात टाकला. राहुल वाघमारे या विजयाचा शिल्पकार ठरला. नांदेडकडून याकूब पठाण, राहुल मोहिते यांनी पुण्याची चांगलीच दमछाक केली. अ-गटात रत्नागिरीने साताऱ्याचा ३५-२९ असा पराभव केला. पारस पाटील, ओंकार दोरकडे यांना या विजयाचे श्रेय जाते. धवनकुमार चव्हाण, अथर्व वाघमारे साताराकडून उत्तम खेळले. याच गटात कोल्हापूरने हिंगोलीला ४८-१४ असे पराभूत करण्यात अथर्व महाडिक, आकाश गोसावी यांचा खेळ महत्त्वपूर्ण ठरला.

ब-गटात परभणीने अजिंक्य मंडलेच्या भन्नाट खेळामुळे बीडला ३०-१२ असे नमवले. याच गटात सांगलीने सिंधुदुर्गला ४३-२७ असे हरवून आगेकूच केली. सांगलीच्या सुयश कोळी, आयुष चव्हाण यांनी, तर सिंधुदुर्गच्या श्रेयस मुरचिते, सुरज मोरे यांनी छान खेळ केला.