नोकरीच्या आमिषापोटी संघ बदलण्याचा पवित्रा घेणाऱ्या कबड्डीपटूंवर चाप बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला. ‘लोकसत्ता’ने या प्रकाराला रविवार विशेषच्या माध्यमातून वाचा फोडली होती.
 माजी राष्ट्रीय खेळाडू वासंती सातव आणि सीमा केळकर यांनी एखादा खेळाडू वर्षांतून किती वेळा संघ बदलू शकतो, असा प्रश्न विचारला. संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी उत्तर देताना आपली भूमिका मांडली. ‘नियम सर्व खेळाडूंना सारखे असून वर्षांतून एकदाच हंगाम सुरू होताना खेळाडू संघ बदलू शकतो. फक्त व्यावसायिक संघांबाबत हा नियम शिथिल करण्यात आला आहे. स्थानिक खेळाडूंना एकदा नोंदणी झाली की वर्षभर त्या संघाकडून खेळणे बंधनकारक राहील’, असे पाटील यांनी सांगितले.
 भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबणाऱ्या खेळाडूंची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी पुढे सांगितले. संघटनेचा निधी दोन कोटींवर नेऊन ती रक्कम मुदत ठेवीत ठेवून त्याच्या व्याजावर संघटनेचा कारभार चालवण्याची सूचनाही त्यांनी  मांडली.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडू, कार्यकर्ते आणि संघटकांचे अभिनंदन सभेत करण्यात आले. सर्व संलग्न जिल्हा संघटनांनी आपला वार्षिक अहवाल राज्य संघटनेला लवकरात लवकर सदार करावा असे आवाहन अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले.