गतविजेत्या पुण्याच्या संघाने मुंबई उपनगर संघावर ३५-२० अशी सहज मात करीत ६१ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील महिला गटात सलग नवव्यांदा अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. पाच हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत पुरुषांमध्ये मात्र पुण्याचे विजेतेपदाचे स्वप्न अपुरेच राहिले. अंतिम लढतीत त्यांना मुंबई उपनगर संघाने १७-११ असे पराभूत केले.
या स्पर्धेत पुण्याने दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठल्यामुळे उत्कंठा निर्माण झाली होती. १४ वर्षांनी एकाच वेळी दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठण्याचा योग पुण्याला आला
होता.
महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या खेळाडूंनी प्रथमपासूनच नियंत्रण मिळविले होते. चौफेर चढाया व उत्कृष्ट पकडी असा खेळ करीत त्यांनी मध्यंतराला १४-३ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. तेथेच पुण्याचे विजेतेपद निश्चित झाले होते. पुण्याकडून स्नेहल शिंदे व लविना गायकवाड यांनी चौफेर चढाया केल्या. आम्रपाली गलांडेने सुरेख पकडी करीत त्यांना योग्य साथ दिली. मुंबई उपनगर  संघाच्या अश्विनी शेवाळे व राजश्री पवार यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य खेळाडू फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत.
पुरुषांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या अष्टपैलू खेळापुढे पुणे संघाला सुरुवातीपासूनच सूर सापडला नाही. मध्यंतराला मुंबई संघाने ११-३ अशी आघाडी घेतली होती. तेथेच पुण्याच्या खेळाडूंनी आपला पराभव मान्य केल्याचे स्पष्ट झाले होते. कारण उत्तरार्धात त्यांनी सामना जिंकण्यासाठी अपेक्षेइतके प्रयत्न केले नाहीत . मुंबईकडून रिशांक देवडिगा व नीलेश शिंदे यांनी केलेल्या वेगवान चढाया पुण्याचे खेळाडू रोखू शकले नाहीत. पुण्याकडून अक्षय जाधवचा अपवाद वगळता एकही खेळाडू चांगली लढत देऊ शकला नाही.
उपांत्य फेरीत पुण्याच्या महिलांनी सांगली संघावर ५५-१२ अशी मात करीत तेथेच विजेतेपदाची झलक दिली होती. अन्य लढतीत मुंबई उपनगर संघाने मुंबई शहरला २६-११ असे हरविले होते. पुरुषांमध्ये पुण्याने सांगली संघाचाच २६-२१ असा पराभव केला होता. या लढतीत पूर्वार्धात पुणे संघ ९-११ असा पिछाडीवर होता. अन्य लढतीत मुंबई उपनगर संघाने रत्नागिरी संघाचे आव्हान १६-६ असे संपुष्टात आणले होते.