News Flash

पुण्याच्या भीतीने सांगली-नंदुरबारचा आटापिटा

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कात टाकणार?

संग्रहित छायाचित्र

गतविजेत्या पुणे संघाची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत दहशत आहे. बाद फेरीत या बलाढय़ संघाला टाळण्यासाठी सांगली आणि नंदुरबारचा अखेरची साखळी लढत हरण्यासाठीचा आटापिटा कबड्डीरसिकांना पाहायला मिळाला. अखेरीस नंदुरबारने जिंकलेला हा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला.

कराड येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेतील पुरुष विभागातील सांगली आणि नंदुरबार यांच्यातील सामन्यातील निकालानुसार फ-गटातील गटविजेता आणि गटउपविजेता संघ ठरणार होता. मात्र गटविजेत्याला बाद फेरीत पुण्याचे आव्हान समोर असणार, हे लक्षात आल्यामुळे या दोन्ही संघांनी त्यानुसार रणनीती आखली. पंच आणि सामना निरीक्षकांनीही वारंवार दोन्ही संघांना सामन्यादरम्यान सूचना केल्या. अखेरीस नंदूरबारने हा सामना ३६-२७ अशा फरकाने जिंकला. राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनीही व्यासपीठावरून ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने दोन्ही संघांना इशारा दिला होता.

‘सांगली-नंदूरबार या संपूर्ण सामन्यात खेळाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला निदर्शनास आहे. दोन्ही संघांना सूचना देऊनही हे संघ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते,’ असा शेरा सामन्याचे सरपंच पी. बी. पाटोळे यांनी गुणपत्रिकेवर लिहिला होता. त्यानंतर संघटनेच्या तांत्रिक समितीने दोन्ही संघांचे प्रशिक्षक व व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुणे, ठाणे, मुंबई, उपनगर दोन्ही गटांत उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या संघांनी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमधून राज्य अजिंक्यपद कबड्डी  स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रायगडने दोन्ही गटांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिलांमध्ये उपनगरने सिंधुदुर्गचे आव्हान ५०-१३ असे आरामात मोडीत काढले. या सामन्यात उपनगरच्या झेबा पठाणने नऊ चढायांमधून सात गुण मिळवले. यात एका चढाईत तिने तीन गुण मिळवण्याची किमया साधली. पूजा जाधवने पकडींचे सहा गुण मिळवत तिला छान साथ दिली. पुण्याने साताऱ्याचा ५८-१३ असा धुव्वा उडवला. पुण्याच्या विजयात सोनाली साळुंखे आणि आम्रपाली गलांडे यांच्या चढाया तसेच कोमल जोशी आणि पूजा शेलार यांच्या पकडींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कात टाकणार?

प्रो कबड्डी लीग, महाराष्ट्र कबड्डी लीग याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होत असताना कराडमध्ये मातीवर होत असलेल्या पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेबाबत कबड्डी क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र पुढील हंगामापासून राज्य अजिंक्यपद स्पर्धा मॅटवरच होईल आणि त्यात बरेच बदल पाहायला मिळतील, असे संकेत राज्य कबड्डी असोसिएशनमधील सूत्रांनी दिले आहेत. गतवर्षी सांगलीवाडी येथील तरुण मराठा व्यायाम मंडळाने मॅटवर कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. याचप्रमाणे पत्र्याचा वापर करीत बंदिस्त स्टेडियमचा प्रयोग करून सर्वाचे लक्ष वेधले होते. तेलंगणा येथे होणारी आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा मॅटवर होत असली तरी यंदाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा मातीवर होत आहे. याबाबत राज्य कबड्डी असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य अजिंक्यपद स्पध्रेचे स्वरूप आम्ही बदलणार आहोत. बंदिस्त स्टेडियम, मॅट यांच्यासह आणखी काही प्रयोगांबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:52 am

Web Title: state kabaddi championship 2
Next Stories
1 मॅरेथॉन संयोजकांकडूनच नियमांची ऐशीतैशी
2 Video : मुरलीचे कोहलीच्या साथीने वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन
3 धवनला बाद करत फिरकीपटू परेराने गाठले विक्रमाचे शिखर
Just Now!
X