महत्त्वाचे पद ग्रामीण महाराष्ट्राकडे जाण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेतील माघारनाटय़ाचा अखेरचा अंक सोमवारी रंगणार आहे. रविवारी अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत ७० वर्षांवरील उमेदवारांना वगळण्याचा आणि सरकार्यवाह किंवा कोषाध्यक्ष या पदांवर ग्रामीण महाराष्ट्राला संधी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य कबड्डी संघटनेची २५ नोव्हेंबरला होणारी निवडणूक बिनविरोधपणे पार पडण्याच्या हेतूने सुकाणू समितीची रविवारी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर अध्यक्षपदाचे दावेदार अजित पवार यांच्याशी बैठक झाली. या वेळी पवार यांनी महत्त्वाच्या पदांसाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या दृष्टिकोनातून उमेदवार हा ७० वर्षांखालील असावा, हे धोरण निश्चित करण्यात आले. त्यामुळे मावळते अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर आणि उपाध्यक्ष गजानन कीर्तिकर यांना सोमवारी माघार घ्यावी लागणार आहे.

कार्यकारिणी समितीच्या १६ पदांकरिता ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचा एकमेव अर्ज आला आहे. उर्वरित पदांसाठी ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम लागू आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या पदवाटपानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कार्यकारिणीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

कार्याध्यक्षपदावर अ‍ॅड. आस्वाद पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे, तर सरकार्यवाह पदाच्या शर्यतीत  उपनगरच्या प्रताप शिंदे यांच्यापेक्षा मंगल पांडे किंवा मुझफ्फर अली सय्यद यांचे पारडे जड आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.