राज्य कबड्डी निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ पदांसाठी ७१ जणांचे अर्ज; पदांच्या समीकरणावर रविवारी शिक्कामोर्तब

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत १६ पदांसाठी ७१ जणांचे अर्ज दाखल झाले असून, अध्यक्षपदासाठीचे एकमेव अर्जदार अजित पवार यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता येत्या रविवारी अजित पवार यांच्यासोबत सुकाणू समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये पदांचे समीकरण निश्चित होईल.

घटनादुरुस्तीनंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीच सर्व अर्ज भरले गेले. अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी दावेदारी केल्यामुळे प्रतिष्ठा निर्माण झालेली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. किशोर पाटील, शांताराम जाधव, दिनकर पाटील, आस्वाद पाटील, प्रताप शिंदे आणि मुझफ्फर अली यांचा समावेश असलेली सुकाणू समिती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ नोव्हेंबरला पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत सत्तेचे गणित निश्चित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सत्तेची आस असणाऱ्या प्रतिनिधींनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यामुळे सोमवारचे माघारनाटय़ औत्सुक्याचे ठरणार आहे.

उपाध्यक्षपदाकरिता भाई जगताप (मुंबई), देवराम भोईर (ठाणे), उत्तमराव माने (सातारा), दिनकर पाटील (सांगली), शशिकांत गाडे (अहमदनगर), सचिन कदम (रत्नागिरी) यांनी अर्ज केले आहेत. कार्याध्यक्षपदासाठी गजानन कीर्तिकर (उपनगर), बाबुराव चांदेरे (रायगड), माणिक राठोड (औरंगाबाद), किशोर पाटील (धुळे), दत्ता पाथ्रीकर (औरंगाबाद), आस्वाद पाटील (रायगड) आणि मंगल पांडे (परभणी) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सरकार्यवाह या सर्वात महत्त्वाच्या पदासाठी आस्वाद पाटील (रायगड), बाबुराव चांदेरे (रायगड), रमेश भेंडिगिरी (कोल्हापूर), मनोज पाटील (ठाणे), मोहन भावसार (जळगाव), माणिक राठोड (औरंगाबाद), मुझफ्फर अली सय्यद (धुळे), शशिकांत ठाकूर (ठाणे), प्रताप शिंदे (उपनगर), विश्वास मोरे (मुंबई) आणि मंगल पांडे (परभणी) यांच्यासह ११ जण उत्सुक आहेत.

महिलांच्या चार पदांसाठी १४ अर्ज

दोन उपाध्यक्ष आणि दोन संयुक्त सचिव अशी चार पदे प्रथमच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, या दोन्ही प्रकारच्या पदांसाठी प्रत्येकी सात म्हणजेच एकूण १४ अर्ज दाखल झाले आहेत. उपाध्यक्षपदासाठी अर्जुन पुरस्कार विजेत्या माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, विजया शेलार आणि हिमाली नार्वेकर यांनी अर्ज भरले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State kabaddi elections presidential path uncontested will be for ajit pawar
First published on: 15-11-2018 at 03:41 IST