यंग प्रभादेवी, ओम साई, साऊथ कॅनरा, अंकुर, गोल्फादेवी, बंडय़ा मारुती, गुड मॉìनग, एच.जी.एस. या मुंबई शहरच्या संघांबरोबर महाराष्ट्र रहाटणी (पुणे), शिव शंकर (ठाणे), सत्यम (उपनगर) यांनी विजय क्लब आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेची बाद फेरी गाठली.

दादर येथील शिवाजी पार्कच्या मदानावर सुरू असलेल्या पुरुषांच्या ‘ई’ गटात शिव शंकरने गुड मॉìनगला ३०-१५ असे नमवत गटात अग्रस्थान पटकाविले. मध्यंतराला १७-०९ अशी आघाडी घेणाऱ्या शिव शंकरने दुसऱ्या सत्रात जोरदार खेळ करीत गुड मॉìनगला डोके वर काढू दिले नाही. नीलेश साळुंखे, सूरज बनसोडे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर झालेल्या सामन्यात गुड मॉìनगने चेंबूर क्रीडा केंद्राचा ४२-१३ असा धुव्वा उडविला. सचिन पास्टे, स्वप्निल भादवणकर यांचा दमदार खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. एच.जी.एस.ने श्री हनुमानवर ३२-१६ अशी मात करीत ‘फ’ गटात प्रथम क्रमांक मिळविला.  एच. जी. एस. कडून विलास जाधव, प्रदीप पवार उत्कृष्ट खेळले.

‘क’ गटात महाराष्ट्र रहाटणीने गोल्फादेवीला १२-०३ असे नमवत गट जेतेपद मिळविले. महाराष्ट्र रहाटणीच्या प्रदीप गिरी, चेतन थोरात यांनी गोल्फादेवीच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली.

ओम साईने रोमहर्षक लढतीत ओम कबड्डीचा प्रतिकार २६-२४ असा संपुष्टात आणत ‘अ’ गटातून उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली. प्रशांत जाधव, सुशील भोसले यांनी उत्कृष्ट खेळ करीत ओम कबड्डीला ११-०९ अशी आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते, परंतु मध्यंतरानंतर दीपक गुप्ता व रुपेश शेलार यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत ओम साईला २ गुणांनी विजय मिळवून दिला.