मावळी मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत उजाला क्रीडा मंडळ (वळ-ठाणे) यांनी पुरुष गटात, तर शिवशक्ती मंडळ (मुंबई शहर) यांनी महिला गटात अजिंक्यपद पटकावले. उजालाचा अक्षय भोईर, तर शिवशक्तीची सोनाली िशगोटे यांना स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

ठाणे धोबी आळी येथील मावळी मंडळाच्या पटांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात उजाला क्रीडा मंडळाने २२-२० अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने श्री समर्थ क्रीडा मंडळाचे आव्हान संपुष्टात आणले व मावळी मंडळ चषक आपल्या नावे केला. अंतिम फेरीत श्री समर्थच्या बाळूराम म्हात्रेने चढाईत पहिला गुण घेत खाते उघडले. मात्र, उजालाच्या प्रतीक पाटीलने चढाईत गुण घेत चुरस निर्माण केली. समर्थच्या सागर पाटीलने एका चढाईत ५ गडी टिपत उजालावर लोण देत आघाडी घेतली, परंतु ती क्षणिक ठरली. उजालाच्या सुमित पाटीलने आपल्या आक्रमणाची धार वाढविली. त्याने एका चढाईत समर्थचे तीन गडी बाद केले आणि त्यानंतर सलग चढाईत गुण घेत उजालाने समर्थच्या लोणची परतफेड करून मध्यंतराला १५-१३ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर सामना आणखी रंगतदार अवस्थेत पोहोचला. समर्थने आपला पवित्रा बदलत उजालाला तोडीस तोड असे उत्तर देत आघाडी घेतली. शेवटची पाच मिनिटे असताना समर्थकडे २०-१९ अशी आघाडी होती. पुन्हा सुमित संघाच्या मदतीला धावला आणि त्याला अक्षय भोईरने मोलाची साथ दिल्यामुळे उजालाने विजयश्री खेचून आणली. उजालाचा सुमित पाटील स्पध्रेतील उत्कृष्ट चढाईचा तर समर्थचा कालिदास पाटील स्पध्रेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरले.

महिला गटातील अंतिम सामना मुंबईतील दोन बलाढय़ संघात झाला. त्यात शिवशक्ती मंडळाने मुंबई पोलीस संघाचा १९-१४ असा पाडाव केला. नाणेफेकीचा कौल शिवशक्तीच्या बाजूने लागला. सोनाली िशगटेने चढाईत गुण व बोनस मिळवीत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पोलिसांच्या शिरिषा शेलारने आपल्या चौथ्या चढाईत कोपराराक्षकाला टिपत संघाचे खाते उघडले. शिवशक्तीने सोनाली िशगटेच्या चढाया व पौर्णिमा जेधेच्या भक्कम पकडीच्या जोरावर १२व्या मिनिटाला पोलिसावर लोण चढवत १६-१० अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सावध खेळ करीत संघाला ५ गुणांनी विजय मिळवून दिला. पोलिसांच्या शिरिषा शेलार, आरती नार्वेकर यांचा खेळ संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला. शिवशक्तीची रेखा सावंत स्पध्रेत उत्कृष्ट पकडीची तर मुंबई पोलीसची आरती नार्वेकर स्पध्रेत उत्कृष्ट चढाईची खेळाडू ठरली.