नवतरुण क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात राजमाता जिजाऊ, राफ नाईक, शिवशक्ती महिला, शिवतेज मंडळ, महेशदादा लांडगे स्पोर्ट्स, महात्मा फुले, महात्मा गांधी, अमरहिंद मंडळ, डॉ. शिरोडकर, स्वराज्य स्पोर्ट्स या संघांनी बाद फेरी गाठली, तर पुरुष गटात शिवशंकर मंडळ, जॉली स्पोर्ट्स, स्वस्तिक मंडळ, हनुमान सेवा, बाबुराव चांदेरे स्पोर्ट्स, आकाश मंडळ, ओम कबड्डी संघ, केदारनाथ मंडळ, बंडय़ा मारुती सेवा, सत्यम सेवा, छावा सडोली, जय शिव मंडळ यांनी बाद फेरीत प्रवेश केला.

कोळशेवाडी, कल्याण (पूर्व) येथील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू झालेल्या महिलांच्या ड-गटात अमरहिंद मंडळाने ज्ञानशक्ती मंडळाचा २७-२२ असा पराभव केला. अमरहिंदच्या तेजस्वीनी पोटे, दिव्या रेडकर यांनी आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला. महात्मा गांधी स्पोर्ट्सने अमरहिंदला २६-१० असे सहज नमवत गटात अग्रस्थान पटकावले. सायली जाधव, तृप्ती सोनावणे यांच्या झंझावाती चढाया, तर करीना कामतेकर, तेजस्वी पाटेकर यांचा भक्कम बचाव यामुळे हा मोठा विजय शक्य झाला. शिवशक्ती महिला संघाने ब-गटात शिवतेज मंडळाचा ४८-१५ असा फडशा पाडला. पूजा यादव, ऋणाली भुवड, मानसी पाटील, पौर्णिमा जेधे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. अ-गटात राजमाता जिजाऊने कर्नाळा स्पोर्ट्स क्लबला ४९-२१ असे नमवले. सलोनी गजमल, मानसी सावंत यांच्या चतुरस्र खेळाने राजमाताने हा विजय साकारला.

पुरुषांच्या ब-गटात गोल्फादेवी सेवा मंडळाने जय हनुमान मंडळावर ३३-२४ अशी मात केली. सिद्धेश पिंगळे, धनंजय सरोज, विष्णू हरमळे यांना विजयाचे श्रेय जाते. इ-गटात नीलेश लाड, विनोद अत्याळकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर बंडय़ा मारुतीने सत्यम मंडळाला २८-१७ असे हरवले. क-गटात आकाश मंडळाने बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनचा १९-१४ असा पाडाव केला. जितेश, विशाल, कल्पेश या पाटील बंधूंच्या खेळाने ही विजयाची किमया साधली.