अपेक्षा टाकळे, सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

मुंबई : पुण्याच्या राजमाता जिजाऊने मुंबईच्या शिवशक्तीवर ३१-२७ असा विजय मिळवत शिवाई प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद पटकावले, तर पुरुषांमध्ये अंकुरने अमर क्रीडा मंडळाला ४०-२५ असे नमवून जेतेपदावर नाव कोरले. शिवशक्तीची अपेक्षा टाकळे आणि अंकुरचा सुशांत साईल स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पध्रेत महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात राजमाताकडे १२-८ अशी नाममात्र आघाडी होती. दुसऱ्या डावात शिवशक्तीने रंगत निर्माण केली. परंतु सायली केरीपाळेचा अष्टपैलू खेळ, त्याला स्नेहल शिंदे, नेहा घाडगे यांची मिळालेली चढाईची, तर पालवी जमदाडे, अंकिता जगताप यांच्या पकडींची साथ यामुळे राजमाताने बाजी मारली. पूजा यादव, अपेक्षा टाकळे, पौर्णिमा जेधे यांची प्रयत्नांची शर्थ अपयशी ठरली.

पुरुषांच्या अंतिम सामन्य्ऋात अंकुरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत विश्रांतीपर्यंत १८-१० अशी आश्वासक आघाडी घेतली होती. सुशांत साईल, अजय देवाडे यांच्या झंझावाती चढाया, त्याला किसन बोटे, मिलिंद कोलते यांच्या पकडींची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. उत्तरार्धात हाच जोश कायम राखत त्यांनी विजयाचा कळस चढवला. संकेत सावंत, रोहित अधटराव, नितीन विचारे यांचा खेळ या सामन्यात त्यांच्या लौकिकाला साजेसा झाला नाही.

पुरुषांमध्ये रोहित अधटराव आणि संकेत सावंत या अमरच्या खेळाडूंना अनुक्रमे स्पर्धेतील सर्वोत्तम चढाई व पकडीचे पारितोषिक देण्यात आले. महिलांमध्ये महात्मा गांधी संघाची पूजा किणी सर्वोत्तम चढाईपटू आणि राजमाताची सायली केरीपाळे सर्वोत्तम पकडपटू ठरली.