नियोजित सात गटांपेक्षा अचानक वाढविण्यात आलेल्या आठव्या वजनी गटासाठी बक्षिसाची रक्कम कोणी द्यावी, या वादात अखेर येथे आयोजित तिसरी राज्यस्तरीय स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली.
जिल्हा क्रीडा अधिकारी व संयोजन समितीचे कोषाध्यक्ष संजय सबनीस यांच्या प्रकृति अस्वास्थ्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे कारण परिषदेने दिले आहे. स्पर्धेचे आयोजक आ. सीमा हिरे व त्यांचे पती महेश हिरे यांनी स्पर्धा रद्द करण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निर्णयाबद्दल पदाधिकाऱ्यांची हेकेखोर भूमिका यास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला. यासंदर्भात राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातपूर येथील क्लब हाऊसच्या मैदानावर शुक्रवारी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरूवात झाली. राज्यभरातून सुमारे २७० पुरूष व महिला कुस्तीपटू या स्पर्धेसाठी उपस्थित होते. पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर काही सामनेही झाले. परंतु, दुसऱ्या दिवशी नियोजित सात गटांऐवजी अजून एक गट वाढविण्यात आल्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतलेल्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. सायंकाळी उशिरापर्यंत स्पर्धेला सुरूवातच झाली नाही. अचानक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री उशिराने स्पर्धा रविवारी सकाळ आणि सायंकाळ सत्रात होईल असेही जाहीर करण्यात आले. परंतु, रविवारी सकाळी स्पर्धा झालीच नाही. नाशिकला तातडीने दाखल झालेले कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.