राज्य मानांकन कॅरम स्पर्धा :– मुंबईचा मोहम्मद घुफ्रान आणि ऐशा खोकावाला यांनी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मोहम्मदने मुंबईच्याच रियाझ अकबर अलीला १५-१४, २३-२२ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या अग्रमानांकित प्रशांत मोरेने संदीप देवरुखकरला १८-१२, २३-१४ अशी धूळ चारली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत मोहम्मदने प्रशांतवर ११-२०, २२-५, १७-९ असा, तर रियाझने संदीपवर २५-५, १६-२२, २५-४ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत अनुभवी ऐशाने रत्नागिरीच्या किशोरवयीन आकांक्षा कदमचा २३-१५, ७-२०, २५-१७ असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यामुळे सलग दुसरी राज्य मानांकन स्पर्धा जिंकण्याचे आकांक्षाचे स्वप्न भंगले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने वैभवी शेवाळेचा २५-६, २५-८ असा धुव्वा उडवला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये ऐशाने काजलवर ६-२३, २५-१४, २१-७ अशी, तर आकांक्षाने वैभवीवर १५-२०, २०-१६, २५-१७ अशी मात करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.