राज्य टेबल टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेस बुधवारी येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील बारा विभागांत एक हजारहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे तर सांघिक विभागात १४८ संघांचा सहभाग निश्चित झाला आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत होणाऱ्या या स्पर्धेस बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता प्रारंभ होत आहे, असे सांगून संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे यांनी सांगितले, ही स्पर्धा पुरुष व महिला, मिडजेट मुले व मुली, १२ वर्षांखालील मुले व मुली, १५ वर्षांखालील मुले व मुली, किशोर व किशोरी, कुमार मुले व मुली, २१ वर्षांखालील मुले व मुली या गटात होणार आहे. स्पर्धेतील सामन्यांना प्रत्यक्ष १३ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल. १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सांघिक सामने होतील. त्यानंतर १६ ते १८ नोव्हेंबर या काळात वैयक्तिक विभागाच्या लढती होणार आहेत. मिडजेट गटाची प्रथमच राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अ‍ॅमको कंपनीने सोळा टेबल्स दिली आहेत. स्पर्धेकरिता एक लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेसाठी गटवार मानांकने-पुरुष-१.नोएल पिंटो, २.रवींद्र कोटियन. महिला-१.दिव्या देशपांडे, २.पूजा सहस्रबुद्धे. २१ वर्षांखालील मुले-१.सानिश आंबेकर, २.सिद्धेश पांडे. मुली-१.सेनहोरा डीसूझा, २.मल्लिका भांडारकर.
कुमार मुले-१.सानिश आंबेकर, २.रवींद्र कोटियन. मुली-१.श्रुती अमृते, २.पायल बोरा. किशोर-१.अश्विन सुब्रमणियम, २.शौर्य पेडणेकर. किशोरी-१.पायल बोरा, २.श्रुती हलेंगडी. १२ वर्षे मुले-१.देव श्रॉफ, २.हृषीकेश मल्होत्रा. मुली-१.स्वस्तिका घोष, २.दिया चितळे. मिडजेट-१.रजवीर शहा, २.मैनक निस्तला. मुली-१.संपदा भिवंडीकर, २.परिधी पोतनीस.