मुंबई उपनगर संघाने अपेक्षेप्रमाणे पाच गटांत विजेतेपद मिळवत राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. तसेच त्यांनी दोन गटांत रौप्यपदक व एका गटात तिसरे स्थान घेतले. तीन गटांत एअर इंडियाला विजेतेपद मिळाले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने कॅडेट मुलांच्या अंतिम लढतीत पुणे संघावर ३-१ अशी मात केली. त्या वेळी मुंबईकडून देव श्रॉफने एकेरीचे दोन सामने व दुहेरीचा एक सामनाजिंकून सिंहाचा वाटा उचलला. पुण्याच्या करण कुकरेजा याने एकेरीचा एक सामना जिंकला. मुलींच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत रायगड संघावर ३-२ असा विजय मिळविला. त्या वेळी त्यांच्याकडून दिव्या चितळे व विधी शहा यांनी एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला तसेच त्यांनी दुहेरीचाही एक सामना घेत संघाला विजय मिळवून दिला.
सबज्युनिअर मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघाने मुंबई शहर संघाला ३-० असे लीलया हरविले. विजयी संघाकडून शौर्य पेडणेकर याने एकेरीचा एक सामना तसेच दुहेरीचा एक सामना जिंकून कौतुकास्पद कामगिरी केली. अश्विन सुब्रमण्यमने एकेरीचा एक सामना घेत त्याला चांगली साथ दिली. मुलींच्या अंतिम लढतीत पायल बोरा हिच्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर मुंबई उपनगरने ठाणे संघावर ३-० अशी मात करीत अजिंक्यपद मिळविले. सृष्टी हालेंगडीने एकेरीचा एक सामना घेत तिला योग्य साथ दिली.
एअर इंडियाने कुमार मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरचे आव्हान ३-१ असे परतविले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने ठाणे संघावर ३-१ असा विजय मिळविला.