सलामीवीर फखार झमानची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि त्याला शोएब मलिकने दिलेली खंबीर साथ या जोरावर पाकिस्तानने तिरंगी टी-२० मालिकेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात करत पाकिस्तानने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासाठी दिलेलं १८४ धावांचं आव्हान पाकिस्तानने सहज पार केलं. दुसरीकडे इंग्लंडकडून व्हाईटवॉश स्विकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मात्र पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान या अंतिम सामन्यात तब्बल ८ विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली टी-२० सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकदाही सामना हरलेला नाहीये. धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा दहावा विजय ठरला आहे.

० – अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फखार झमानने ९१ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम फखारच्या नावावर जमा झाला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या मार्वन सॅम्युअल्सच्या नावावर (८५ धावा नाबाद) हा विक्रम जमा होता.

१ – साहिबजादा फरहान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर यष्टीचीत होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर आज फरहान यष्टीचीत झाला.

२ – पहिल्या षटकात २ गडी माघारी परतल्यानंतर पाकिस्तानने केलेला १८४ धावांचा पाठलाग हा टी-२० क्रिकेटमधला दुसरा सर्वोत्तम पाठलाग ठरला आहे. इंग्लंडने २०१४ सालात श्रीलंकेविरुद्ध १९० धावांचा पाठलाग केला होता.

८ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात सलग ८ वेळा हरण्याची परंपरा आज पाकिस्तानच्या संघाने मोडली.

९ – तिरंगी मालिकेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा पाकिस्तानचा २०१६ टी-२० विश्वचषकानंतरचा नववा विजय ठरलाय. २०१६ टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तान आतापर्यंत एकही टी-२० मालिका हरलेला नाहीये.

२८ – तब्बल २८ वर्षांनी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकला आहे. १९९० साली वासिम अक्रमच्या पाकिस्तानी संघाने शारजा येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. या सामन्यात अक्रमने हॅटट्रीकही केली होती.

९१ – फखार झमानने टी-२० क्रिकेटमधली आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. झमानने आपल्याच नावावर असलेला ७३ धावांचा विक्रम मोडीत काढला.