श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच कसोटी सामन्यात मोठा धक्का बसला आहे. यजमान श्रीलंकाने गॅले कसोटीत ३ पेक्षा कमी दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा २७८ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी श्रीलंकेने दिलेल्या ३५२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात ७३ धावांवर गारद झाला. दरम्यान या सामन्यात ११ विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

० – दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाने आतापर्यंत डेल स्टेन इतके बळी घेतलेले नाहीयेत. स्टेनने पहिल्या कसोटी सामन्यात शॉन पोलॉकच्या ४२१ बळींच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१ – कसोटी क्रिकेटमध्ये १५० बळी घेणारा कगिसो रबाडा हा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. २३ वर्ष ५० दिवसात रबाडाने हा विक्रम केला आहे. याआधी भारताच्या हरभजन सिंहच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. हरभजनने २३ वर्ष १०६ दिवसांत हा विक्रम केला होता.

१ – प्रतिस्पर्धी संघाला दोन्ही डावात २०० पेक्षा कमी धावसंख्येत रोखून २० बळी घेण्याची श्रीलंकेच्या संघाची ही पहिलीच वेळ ठरली. पहिल्या डावात आफ्रिकेने १२६ तर दुसऱ्या डावात ७३ धावा केल्या.

२ – दक्षिण आफ्रिकेची ७३ ही धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. २००७ साली कोलंबो कसोटीत बांगलादेशने लंकेविरुद्ध केवळ ६२ धावा केल्या होत्या.

३ – दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातली ७३ ही धावसंख्या संयुक्तपणे सर्वात कमी तिसरी धावसंख्या ठरली आहे. बांगलादेशने लंकेविरुद्ध सामन्यात २००७ साली केलेल्या ६२ धावा पहिल्या स्थानावर, १९९४ साली कँडी कसोटीत श्रीलंकेच्या पाकिस्ताविरुद्धच्या ७१ धावा दुसऱ्या स्थानावर, तर २००६ साली कँडी कसोटीत पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेच्या ७३ धावा या तिसऱ्या स्थानावर आहेत. आफ्रिकेने लंकेच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

४ – रंगना हेरथ आणि दिलरुवान पेरेरा यांनी श्रीलंकेकडून दोन्ही डावात गोलंदाजीची सुरुवात केली. अशी कामगिरी करणारे हेरथ-पेरेरा ही चौथी जोडगोळी ठरली आहे.

४ – कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवणारा सुरंगा लकमल हा श्रीलंकेचा चौथा कर्णधार ठरला आहे. याआधी महेला जयवर्धने, कुमार संगकारा, रंगना हेरथ यांनी कर्णधार म्हणून आपला पहिला कसोटी सामना जिंकला होता.

६ – दक्षिण आफ्रिकेची एडन मार्क्रम आणि डीन एल्गर ही जोडी दुसऱ्या डावात यष्टीचीत होऊन माघारी परतली. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात दोन्ही सलामीवीर यष्टीचीत होऊन माघारी परतण्याची ही सहावी वेळ ठरली.

७ – दुसऱ्या डावातली दक्षिण आफ्रिकेची ७३ ही धावसंख्या आशिया खंडातली संयुक्तरित्या सातवी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. आशिया खंडामध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या संघाच्या नावावर आहे. १९८६ साली वेस्ट इंडिजचा संघ केवळ ५३ धावात माघारी परतला होता.

१० – कसोटी क्रिकेटच्या इतिहासातली दक्षिण आफ्रिकेची ही दहावी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

७३ – कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर ७३ ही दक्षिण आफ्रिकेची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. याआधी २०१५ साली नागपूर कसोटीत भारताविरुद्ध आफ्रिकेचा संघ ७९ धावांत गारद झाला होता.